भारताची जबरदस्त ऑलराऊंडर 'स्नेह राणा'- कम बॅक असावा तर असा, जबरदस्त फॉर्म आणि उत्तम खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2025 15:14 IST2025-10-10T15:10:08+5:302025-10-10T15:14:23+5:30

Women's Cricket World Cup 2025: India's best all-rounder 'Sneh Rana' - her comeback is in tremendous form and great play : स्नेह राणाचा खेळ पाहून सारेच थक्क.

सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती वर्ल्ड कपची. महिला संघ यंदा फार जोषात मैदानात उतरला आहे. काही चेहेरे त्यांची ताकद दाखवताना यंदा पाहायला मिळत आहेत. झालेले सगळे सामने जोरदार खेळणारी ऑलराऊंडर म्हणजे स्नेह राणा.

स्नेह राणा ही भारतीय महिला क्रिकेट संघातील एक सक्षम ऑलराउंडर खेळाडू आहे. तिचा जन्म १८ फेब्रुवारी १९९४ रोजी देहरादून, उत्तराखंड येथे झाला. लहानपणापासूनच तिला क्रिकेटची आवड होती आणि ती गल्लीतल्या मुलांसोबत खेळत असे.

स्नेहने देहरादूनमध्ये शिक्षण घेतले. शालेय स्पर्धांपासूनच तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील कौशल्यामुळे ती लवकरच स्थानिक स्तरावर प्रसिद्ध झाली. नंतर तिने पंजाब आणि रेल्वे संघाकडून डोमेस्टिक सामने खेळले.

२०१४ मध्ये तिने भारतीय महिला क्रिकेट संघाकडून श्रीलंका विरुद्ध वनडे आणि टी-२० सामन्यांमधून पदार्पण केले. ती फलंदाज आणि राईट हॅण्ड ऑफस्पिनर गोलंदाज असून दोन्ही क्षेत्रात ती संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

२०१६ मध्ये तिला गंभीर दुखापत झाली आणि तिला काही वर्षे क्रिकेटपासून दूर राहावे लागले. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता, पण तिने हार न मानता सराव सुरु ठेवला. डोमेस्टिक सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन तिने पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तिने नाबाद ८० धावा आणि ४ विकेट्स घेतल्या. त्या कामगिरीनंतर ती चर्चेत आली आणि तिचे पुनरागमन भारतीय महिला क्रिकेटसाठी प्रेरणादायी ठरले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ती नक्कीच उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे.