शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:26 IST2025-09-29T17:14:36+5:302025-09-29T17:26:09+5:30

Ishwar Gurjar : ईश्वर गुर्जर दहावीत नापास झाले. कमी गुणांमुळे ते इतका निराश झाले की त्यांनी थेट शिक्षण सोडण्याचा विचार केला.

राजस्थानमधील भिलवाडा येथील ईश्वर लाल गुर्जर यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ईश्वर हे दहावीत नापास झाले, पण नंतर तीन वेळा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता ते आयपीएस अधिकारी आहेत.

२०११ मध्ये ईश्वर गुर्जर दहावीत नापास झाले. कमी गुणांमुळे ते इतके निराश झाले की त्यांनी थेट शिक्षण सोडण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांच्या शेतकरी वडिलांच्या एका सल्लाने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे.

ईश्वर यांचे वडील सुवालाल गुर्जर म्हणाले होते की, "इतक्या लवकर शिक्षणाला घाबरण्याची गरज नाही. तुला आज शिक्षणाचं महत्त्व समजणार नाही, पण भविष्यात तुला नक्कीच त्याच महत्त्व कळेल."

ईश्वर दहावीच्या परीक्षेत पुन्हा बसले आणि ५४% मिळवले. बारावीत ६८ टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी महर्षि दयानंद विद्यापीठ, अजमेर येथून बॅचलर डिग्री मिळवली.

दहावीत नापास झाल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून मिळालेला मोलाचा सल्ला त्यांना नेहमीच आठवत होता, त्यामुळेच ६ वेळा नापास झाल्यानंतरही त्यांनी कधीच आशा सोडली नाही.

२०१८ मध्ये राजस्थान वनरक्षक भरती परीक्षा, तुरुंगरक्षक भरती परीक्षा आणि आरएएस मुख्य परीक्षेतही नापास झाले. २०१९ मध्ये यूपीएससी प्रिलिम्स, २०२० मध्ये यूपीएससी मुलाखत आणि २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षेत नापास झाले.

हा असा काळ होता जेव्हा अपयश आणि यश हातात हात घालून चालत होतं. ते सहा वेळा नापास झाले, तरी सहा परीक्षांमध्ये यशस्वी झाले. ते पहिल्यांदा आरईईटी उत्तीर्ण झाले आणि २०१९ मध्ये शिक्षक झाले.

२०२१ मध्ये राजस्थान पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. २०२१ मध्ये ते आरएएस परीक्षा उत्तीर्ण झाले आणि एसडीएम झाले. २०२२ च्या UPSC मध्ये AIR ६४४ मिळवून ते IRS अधिकारी झाले.

२०२३ च्या UPSC मध्ये AIR ५५५ मिळवून ते IPS अधिकारी झाले. २०२४ च्या UPSC परीक्षेत त्यांनी AIR ४८३ मिळवली. अपयशाने ते कधीच खचले नाहीत.

दहावीत नापास झाल्यानंतर निराश झालेल्या ईश्वर लाल गुर्जर यांनी तीन वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांची ही गोष्ट तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.