Simran Bala : सॅल्यूट! CRPF च्या पुरुष टीमचं नेतृत्व करणार, कर्तव्यपथावर इतिहास रचणार; कोण आहे सिमरन बाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:40 IST2026-01-22T12:32:36+5:302026-01-22T12:40:57+5:30
Simran Bala And Republic Day : २६ वर्षीय असिस्टंट कमांडंट सिमरन बाला २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलनात सीआरपीएफ तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरून इतिहास रचणार आहेत.

कर्तव्यपथावरील यंदाची प्रजासत्ताक दिन परेड अनेक अर्थांनी खास असणार आहे. या परेडमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) पुरुष युनिटची कमान जम्मू-काश्मीरच्या महिला अधिकारी सिमरन बाला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

२६ वर्षीय असिस्टंट कमांडंट सिमरन बाला २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलनात सीआरपीएफ तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरून इतिहास रचणार आहेत.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या या भव्य परेडमध्ये ही एक ऐतिहासिक घटना असेल. संचलनादरम्यान सिमरन १४० हून अधिक पुरुष सीआरपीएफ जवानांचे नेतृत्व करतील.

देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलासाठी आणि संपूर्ण भारतातील वर्दी परिधान करणाऱ्या महिलांसाठी हा मोठा सन्मान असेल. ही सर्वांसाठी एक अभिमानास्पद बाब आहे.

पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गावाची रहिवासी सिमरन जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमधील एका सीमावर्ती गावातील रहिवासी आहेत. हे गाव पाकिस्तानकडून होणाऱ्या विनाकारण गोळीबारामुळे नेहमीच बाधित असतं.

मोर्टार आणि गोळ्यांपासून वाचत त्यांचं बालपण गेले. जम्मूचे निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन अनिल गौर यांनी म्हटलं की, "हा एक क्रांतिकारी बदल आहे, जो अडथळे दूर करून वर्दीतील महिलांना स्वतःचं भविष्य स्वतः घडवण्याची संधी देतो."

सिमरन यांचा प्रेरणादायी प्रवास
सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि तिथल्या कठीण परिस्थितीनेच सिमरन यांना सशस्त्र दलात सामील होऊन देशाची सेवा करण्याची प्रेरणा दिली. सिमरन यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण नौशेरा येथे घेतलं, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या जम्मूला गेल्या.

गांधीनगर येथील सरकारी महिला महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. पदवीच्या शेवटच्या सत्रात असतानाच त्यांनी यूपीएससी सीएपीएफ (UPSC CAPF) परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.

जून २०२३ मध्ये त्यांची यूपीएससी सीएपीएफ परीक्षेत निवड झाली. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या जम्मू-काश्मीरच्या एकमेव महिला ठरल्या. त्यांनी १५१ उत्तीर्ण उमेदवारांमध्ये ८२ वा 'ऑल इंडिया रँक' मिळवला.

निवडीनंतर त्यांना गुरुग्राम येथील सीआरपीएफ अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान त्यांना 'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकारी' (Best Officer Trainee) या पुरस्काराने गौरवण्यात आले.

एप्रिल २०२५ मध्ये त्या सीआरपीएफमध्ये रुजू झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती छत्तीसगडमधील 'बस्तरिया' बटालियनमध्ये करण्यात आली, जिथे त्यांच्यावर नक्षलविरोधी मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिन परेडमध्ये भारताची सैन्य ताकद आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडतं. सीआरपीएफ हे देशातील सर्वात मोठं अंतर्गत सुरक्षा दल असून, नक्षलविरोधी मोहीम, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद विरोधी कारवाया आणि ईशान्येतील बंडखोरी रोखण्यात या दलाची महत्त्वाची भूमिका असते.

















