शुगर वाढलीये? टेन्शन सोडा - डॉक्टर सांगतात, करा ५ घरगुती उपाय - शुगर राहील कायम नियंत्रणात, मिळेल आराम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2025 17:25 IST2025-12-31T17:06:10+5:302025-12-31T17:25:54+5:30
natural ways to reduce blood sugar : doctor shares tips to lower blood sugar : lower blood sugar naturally : easy ways to control blood sugar : शुगर वाढल्यावर घाबरून जाण्याऐवजी, काही सोपे घरगुती उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होते.

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, चुकीचा आहार, ताणतणावामुळे आणि व्यायामाच्या (natural ways to reduce blood sugar) अभावामुळे ब्लड शुगर अचानकपणे वाढण्याची समस्या अनेकांना जाणवते. कधी अचानक गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपफर्थ खालले, तर कधी अपुरी झोप किंवा मानसिक तणाव यामुळे शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते. अशावेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य वेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होते.

औषधांसोबतच नैसर्गिक आणि सुरक्षित घरगुती उपाय शुगर लेव्हल कमी करण्यात मदत करू शकतात आणि शरीरावर होणारे दुष्परिणामही कमी करतात.

प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी ब्लड शुगर पटकन कमी करण्यासाठी काही सहजसोपे असे घरगुती उपाय सांगितले आहेत.

१. हाय-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग :-
डॉक्टरांच्या मते, हाय-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग म्हणजे थोड्या वेळासाठी अत्यंत वेगाने किंवा जोरात व्यायाम करणे आणि त्यानंतर काही काळ विश्रांती घेणे. व्यायामाची ही पद्धत रक्तातील अतिरिक्त साखर अवघ्या काही मिनिटांत कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. सुरुवातीला १ ते २ मिनिटे खूप वेगाने व्यायाम केल्यामुळे शरीरातील स्नायूंना मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज भासते. स्नायू ही ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेचा वेगाने वापर करतात, ज्यामुळे शुगर लेवल कमी होते.

२. ॲप्पल सायडर व्हिनेगर :-
ॲप्पल सायडर व्हिनेगरमध्ये असणारे 'ॲसिटिक ॲसिड' जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याचा वेग मंदावण्यास मदत करते. जर तुम्ही आहारात जास्त कर्बोदके म्हणजेच भात, पोळी किंवा बटाट्यासारखे पदार्थ खाल्ले असतील, तर ॲप्पल सायडर व्हिनेगर अत्यंत गुणकारी ठरते. एक मोठा टेबलस्पून ॲप्पल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्यास, जेवणानंतर वाढणारी साखरेची पातळी ३४% पर्यंत कमी होऊ शकते. ॲसिटिक ॲसिड अन्नातील पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रियेचा वेग कमी करते. हे शरीरातील पेशींना रक्तातील साखर शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

३. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम :-
रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही दोन्ही खनिजे शरीराला अत्यंत आवश्यक असतात. पोटॅशियम रक्तातील जास्तीची साखर यकृत आणि स्नायूंमध्ये साठवण्यास मदत करते. जर शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल, तर साखर पेशींमध्ये व्यवस्थित प्रवेश करू शकत नाही. परिणामी, रक्तात साखरेचे प्रमाण वाढते आणि ती कमी करण्यासाठी शरीरात 'इन्सुलिन'चे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शरीरात इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींच्या कार्यक्षमतेसाठी मॅग्नेशियमची गरज असते. संशोधनानुसार, बहुतांश मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. जर मॅग्नेशियम पुरेसे असेल, तर शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि साखर नियंत्रणात राहते.

४. जेवणानंतर २५ ते ३० मिनिटे चालणे :-
जर रोजच्या आहारात कर्बोदके असलेले पदार्थ जास्त प्रमाणांत खाल्ले असतील तर, त्यानंतर २५ ते ३० मिनिटे चालणे अत्यंत फायदेशीर ठरते. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपले स्नायू रक्तातील अतिरिक्त साखरेचा वापर करतात. चालल्याने रक्तातील वाढलेल्या साखरेला लगेच ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. यामुळे शरीरातील चरबी लगेच जळत नसली, तरी रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखली जाते आणि शरीर सुरक्षित राहते. यामुळे फक्त शुगरच नियंत्रित राहत नाही, तर अन्नाचे पचनही नीट होण्यास मदत होते.

५. मिठाचे पाणी :-
स्ट्रेस हे रक्तातील साखर अचानक वाढण्याचे एक मोठे कारण असू शकते. अशावेळी मिठातील सोडियम ही वाढलेली पातळी कमी करण्यास मदत करू शकते. शरीरात सोडियमचे योग्य प्रमाण असल्यास 'स्ट्रेस हार्मोन्स' नियंत्रित राहण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी थोड्या प्रमाणात समुद्री मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीरातील स्ट्रेस कमी होतो. मिठाच्या पाण्यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो, ज्यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. चांगली झोप आणि कमी तणावामुळे रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
















