Meghana Sajjanar : मातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम! ८ महिन्यांच्या गरोदर मेघना सज्जनार यांची कमाल; सुवर्णपदकावर कोरलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:05 IST2026-02-10T16:59:17+5:302026-02-10T17:05:19+5:30
Meghana Sajjanar : भारतीय महिला नेमबाज मेघना सज्जनार यांनी एशियन शूटिंग चँपियनशिप २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

भारतीय महिला नेमबाज मेघना सज्जनार यांनी एशियन शूटिंग चँपियनशिप २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी आधी १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये कांस्य पदक पटकावलं आणि त्यानंतर १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकून कमाल केली.

विशेष म्हणजे मेघना सज्जनार या सध्या ८ महिन्यांच्या गरोदर आहेत. या स्थितीतही त्यांनी जी जिद्द दाखवली, त्याला सर्वच स्तरांतून सलाम केला जात आहे. सर्वजण भरभरून कौतुक करत आहेत.

गरोदरपणाच्या काळात खेळाडू किंवा कोणत्याही महिलेला विश्रांती घेण्याचा आणि शारीरिक हालचाली कमी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मेघना यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि स्वतःला सिद्ध करत अनेक पदकं जिंकली.

मेघना यांनी १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं, तर १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. या सांघिक खेळात त्यांच्यासोबत इलावेनिल आणि आर्य या खेळाडूंचा समावेश होता.

या त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थान गाठलं आणि सुवर्णपदकावर मोहर उमटवली. मेघना यांच्या या अभूतपूर्व यशानंतर SAI ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर मेघना यांचा फोटो शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं.

"गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात मैदानात उतरून मेघना या स्पर्धेत ताठ मानेने उभ्या राहिल्या. मातृत्व आणि उत्कृष्ट कामगिरी हे दोन्ही कसं असू शकतं हे त्यांनी सिद्ध केलं आहे."

"ही केवळ एका पदकाची गोष्ट नाही, तर ही जिद्द, धाडस आणि ठाम निश्चयाची ओळख आहे. जेव्हा स्त्रिया पुढे जातात, तेव्हा इतिहास घडतो" असं म्हणत कौतुक केलं आहे. मेघना यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

















