एक केसर चाय की प्याली हो! रिमझिम पावसात प्या केशर चहा, मन आनंदी करणारी स्पेशल चहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 15:18 IST2025-07-30T14:20:00+5:302025-07-30T15:18:21+5:30

रिमझिम पाऊस सुरू झाला की हमखास गरमागरम चहा प्यावा वाटतो. पावसामुळे वातावरणात भरून राहिलेला गारवा आणि त्याच्या जोडीला गरमागरम सुगंधी चहा असा बेत म्हणजे काही औरच मजा..

आता वेलचीचा चहा, आल्याचा चहा, गवती चहा असे चहा आपण नेहमीच पितो. आता यावेळी थोडा बदल करा आणि रिमझिम बरसणाऱ्या श्रावण सरींमध्ये वाफाळता सुगंधी केशर चहा पिऊन पाहा..

हा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी केशराच्या ७ ते ८ काड्या थोड्याशा गरम पाण्यात किंवा गरम दुधात ५ ते १० मिनिटांसाठी भिजत घाला.

यानंतर पातेल्यामध्ये १ कप पाणी घ्या आणि त्यामध्ये केशराचं पाणी, वेलची पूड, किसलेलं आलं, चहा पावडर, गरजेनुसार साखर घालून ते गॅसवर उकळायला ठेवा. मध्यम आचेवर हे पाणी चांगलं उकळवून घ्या.

यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये १ कप दूध आणि केशराच्या २ ते ३ काड्या घाला. पुन्हा मध्यम आचेवर चहा चांगला उकळू द्या.

चहा उकळी आल्यानंतर तो नेहमीप्रमाणे गाळून घ्या. गरमागरम केशर चहा तयार..

चहाला चांगला स्वाद येण्यासाठी चहा नेहमीच मध्यम आचेवर उकळावा. गॅसची फ्लेम मोठी करून चहा पटकन उकळवून घेण्याची घाई करणं टाळावं. कारण असं केल्याने मसाल्यांचा स्वाद चहामध्ये चांगला मुरत नाही.