थंडीमुळे हात कोरडे पडले, सुरकुतल्यासारखे दिसू लागले? 'हे' घरगुती स्क्रब वापरा, हात होतील मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 12:12 IST2025-11-18T12:02:53+5:302025-11-18T12:12:28+5:30

थंडी वाढली की त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. अगदी हात सुद्धा सुरकुतल्यासारखे, कोरडे पडलेले दिसू लागतात. त्यात धुणी, भांडी, स्वच्छता यासारख्या कामामुळे वारंवार पाण्यात हात घालावेच लागतात. त्यामुळेही हात कोरडे पडलेले सुरकुतलेले दिसू लागतात.

चेहऱ्याची काळजी घेताना हाताकडे मात्र थोडंसं दुर्लक्षच होतं. म्हणूनच आता पुढे सांगितलेल्या पद्धतीने एक घरगुती स्क्रब तयार करा आणि त्याने हाताला मालिश करा. हातांचा कोरडेपणा जाऊन हात अगदी मऊ, मुलायम होतील. हे स्क्रब तुम्ही पाय, मान, पाठ स्वच्छ करण्यासाठीही वापरू शकता.

स्क्रब तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये १ वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्या. हे दोन्ही पदार्थ टॅनिंग कमी करून त्वचा स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

आता यामध्ये २ चमचे ग्लिसरीन, २ चमचे बदामाचं तेल किंवा मग खोबरेल तेल घाला. यामुळे हा स्क्रब त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतो.

आता यामध्ये २ चमचे भाजलेली हळद टाका. त्वचेवर चमक येण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त असते.

आता सगळ्यात शेवटी यामध्ये व्हिटॅमिन ई च्या २ ते ३ कॅप्सूल घाला. तसेच हे मिश्रण कालविण्यासाठी लागेल तेवढं गुलाबजल त्यात घाला. हे मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ बनवू नये.

आता हे मिश्रण हातावर घ्या आणि ३ ते ४ मिनिटे त्याने हात चाेळून काढा. त्यानंतर ५ मिनिटांनी ते धुवून टाका. हात धुतल्यानंतर व्यवस्थित मॉईश्चराईज करा.

हाताचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करू शकता.