उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2025 18:22 IST2025-10-23T18:07:16+5:302025-10-23T18:22:02+5:30

How to Make Udupi Style South Indian Chutney at Home : how to make Udupi style chutney : South Indian chutney recipe : Udupi coconut chutney recipe : hotel style South Indian chutney : उडप्याच्या हॉटेलसारखी खमंग चटणी घरीच तयार करणे झाले सोपे, फक्त ७ टिप्स आणि चटणी तयार...

इडली, डोसा किंवा मेदूवड्यासोबत मिळणारी पांढरीशुभ्र, चवदार आणि खमंग चटणी (how to make Udupi style chutney) अगदी सगळ्यांच्याच आवडीची... या चटणीच्या खमंगपणामुळेच यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांना अस्सल पारंपरिक चव येते. या चटणी शिवाय इडली, डोसा, मेदूवडा हे पदार्थ अधुरेच आहेत. आपण अनेकदा उडप्याकडे मिळते अगदी तशाच चवीची चटणी घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु उडप्याच्या स्पेशल चटणीसारखी चव आणि टेक्श्चर त्याला येत नाही.

उडप्याकडे मिळते तशाच चवीची चटणी घरी केली तरी त्यात फरक जाणवतोच. त्यामुळे उडपी स्टाईलची चटणी घरच्याघरीच तयार करण्यासाठी खास टिप्स पाहूयात... या टिप्सच्या मदतीने आपण इडली - डोसा किंवा मेदूवड्यासोबत खाल्ली जाणारी परफेक्ट उडपी स्टाईल चटणी सहज तयार करू शकता.

१. चटणीसाठी नेहमी ताज्या ओल्या नारळाचा वापर करा. सुक्या खोबऱ्यामुळे चटणीला हॉटेल किंवा उडप्याकडे मिळते तशी चव येत नाही. नारळाच्या पाठीमागे असलेला जाड तपकिरी भाग शक्य असल्यास काढून टाका. यामुळे चटणीला एकदम शुभ्र पांढरा रंग येतो.

२. चटणीमध्ये २ चमचे भाजलेली फुटाण्याची डाळ घाला. यामुळे चटणीला आवश्यक दाटपणा येतो.

३. चटणीला खमंग चव येण्यासाठी त्यात २ ते ३ लसणाच्या पाकळ्या, एक इंच आलं आणि आवश्यकतेनुसार हिरवी मिरची तसेच लाल सुकी मिरची देखील घाला. हिरवी मिरची जास्त तिखट नसेल तर थोडी जास्त घाला, कारण त्यामुळे रंगही छान येतो.

४. चटणीला परफेक्ट आंबट चव येण्यासाठी छोटी चिंच किंवा १ चमचा दही/ताक वापरा. उडपी चटणीत चिंचेचा वापर अधिक केला जातो, ज्यामुळे चटणी अधिक काळ टिकते.

५. चटणी मिक्सरमध्ये वाटताना त्यात थोडे थंड पाणी किंवा बर्फाचे २ ते ३ खडे घाला, यामुळे चटणीचा रंग हिरवा किंवा पिवळा न पडता पांढरा राहतो.

६. चटणीची खरी चव तिला दिलेल्या फोडणीत असते. फोडणीसाठी खोबरेल तेल वापरल्यास अधिक चांगली चव येते. तेलात मोहरी, उडीद डाळ, कडीपत्ता आणि हिंग घाला. उडदाची डाळ हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. यामुळे फोडणीला खमंग चव आणि सुगंध येतो. फोडणी गरम असतानाच चटणीवर ओता आणि पटकन मिक्स करा.

७. चटणीत मीठ सगळ्यात शेवटी घाला, कारण चटणीला जास्त पाणी सुटून ती पातळ होऊ शकते.