कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:32 IST2025-05-03T17:08:45+5:302025-05-03T17:32:28+5:30

काही सोप्या टीप्स मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल मुलांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. जास्त स्क्रीन टाईम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर नकारात्मक परिणाम करू शकतो. पालकांसाठी आपल्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवणं आणि त्यांचं व्यसन सोडवणं आव्हानात्मक होत चाललं आहे.

आजकाल बरीच मुलं फोन नसेल तर जेवतही नाहीत. यामुळे मुलं खूप हट्टी आणि चिडचिडी होतात. सध्या ही एक मोठी समस्या आहे. अनेक पालकांना हा प्रश्न पडतो की मुलांचं मोबाईल व्यसन कसं सोडवायचं? काही सोप्या टीप्स मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

मुलांच्या मोबाईल वापरासाठी एक निश्चित वेळ मर्यादा ठरवा. त्यांना सांगा की मोबाईलचा वापर फक्त अभ्यास, रिसर्च किंवा मनोरंजनासाठी आणि मर्यादित काळासाठीच करावा. फक्त एक किंवा अर्धा तास मोबाईल पाहायचा असा स्क्रीन टाईम ठरवा.

मुलांना बाहेर खेळण्यात, धावण्यात आणि इतर शारीरिक हालचालींमध्ये सहभागी करा. यामुळे त्यांचे लक्ष मोबाईलवरून हटेल आणि ते शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहतील. मुलांना खेळ, पोहणं, गाणं, डान्स करणं याचे क्लास लावू शकता.

मुलांना वाचणाची आवड लावा. छान छान गोष्टींची पुस्तकं वाचायला द्या. त्यांचे छंद जोपासा. जेणेकरून त्यांना विविध गोष्टींमध्ये रस निर्माण होईल आणि ते मोबाईलचा वापर करणार नाही.

मुलांना मोबाईलऐवजी बोर्ड गेम, पझल्स किंवा शैक्षणिक खेळणी द्या. यामुळे स्क्रीन न वापरता मनोरंजन करता येतं. बुद्धीला चालना द्या जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

कुटुंबासोबत वेळ घालवा आणि मुलांना मोबाईल नसतानाही आनंदी राहण्याचं महत्त्व शिकवा. त्यांच्याशी बोला आणि त्यांना कुटुंबासाठी वेळ किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून द्या. एकत्र जेवा आणि चर्चा करा. आठवड्याच्या शेवटी त्यांना बागेत फिरायला घेऊन जा.

मुलं मोबाईलवर नेमकं काय पाहत आहेत यावर कंट्रोल ठेवा. त्यांच्यावर नीट लक्ष असू द्या. फक्त शैक्षणिक आणि सकारात्मक कंटेंट उपलब्ध करून द्या. अनावश्यक एप्स काढून टाका.

पालकांनी मुलांसमोर मोबाईलचा वापर करणं टाळा. मुलं सहसा त्यांच्या पालकांचं अनुसरण करतात, म्हणून त्यांना दाखवा की मोबाईलशिवायही जीवन आनंददायी असू शकतं.

मुलांचं मोबाईल व्यसन दूर करण्यासाठी संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. तुम्ही स्क्रीन टाइम मर्यादित करून त्यांच्या छंदाला प्रोत्साहन देऊ शकता. यामुळे मुलांच्या सवयी सुधारण्यास मदत होईलच, शिवाय मुलांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगलं राहिल.