Gudhi Padva 2026: गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या चटणीचे एवढे महत्त्व का- कशी करायची चटणी? घ्या पांरपरिक रेसिपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 15:22 IST2026-03-17T15:16:09+5:302026-03-17T15:22:33+5:30

गुढीपाडव्याच्या दिवशी (Gudhi Padva 2026) श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळीचा मान तर असतोच. पण या सगळ्यांप्रमाणेच एका कडवट पदार्थालाही खूप महत्त्व असते आणि तो पदार्थ म्हणजे कडुलिंबाच्या पानांची चटणी. कारण ही चटणी अतिशय आरोग्यदायी असते आणि नविन वर्षाची सुरुवात ही चटणी खाऊन करायलाच हवी, असं आपल्याकडे म्हणतात.(how to do kadulimb chutney?)

आता ही चटणी नेमकी कशी करायची याचा प्रश्न अनेकींना पडतो. जुन्याजाणत्या वयस्कर महिलांना त्याची रेसिपी माहिती आहे. पण नुकत्याच संसारात पडलेल्या कित्येकींना ही चटणी कशी करायची हे माहिती नसते. त्यांच्यासाठीच ही खास रेसिपी...(kadulimb chutney recipe for gudhi padva 2026)

कडुलिंबाची चटणी करण्यासाठी कडुलिंबाची अगदी कोवळी पानं घ्यावीत. त्याची पांढरी फुलं थोड्या प्रमाणात घेतली तरी चालेल. पानं आणि फुलं स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर चिंच भिजत घालून तिचा कोळ काढून घ्या. चिंचेचा कोळ नसल्यास लिंबू पिळले तरी चालते.

कडुलिंबाची पानं खलबत्त्यामध्ये वाटून घ्या. किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. यावेळी त्यात थोडा ओवा, जिरे, थोडासा खोबऱ्याचा किस घाला.

आता मिक्सरमधलं वाटण एका भांड्यात काढा. त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. चवीनुसार थोडंसं मीठ घाला. सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घेतले की कडुलिंबाच्या पानांची चटणी झाली तयार.

काही ठिकाणी या चटणीचा कडवटपणा कमी करण्यासाठी तिच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट, वाटलेली हरबरा डाळही घालतात.

















