इडलीचं बदलेल रुप, करा हिरवीगार पालक इडली-दिसायला सुंदर चवही जबरदस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 15:31 IST2025-01-24T15:19:13+5:302025-01-24T15:31:20+5:30

इडली हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. इडली सांबार, इडली चटणी असं काहीही केलं तरी इडली प्रेमींना ते आवडतच..
आता आपल्या नेहमीच्या इडलीमध्ये थोडा बदल करा आणि हिरवीगार खमंग पालक इडली करा. ही इडली एवढी चवदार होईल की तिच्या जोडीला सांबार, चटणी असं काही नसलं तरी चालेल.
पालक इडली करण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ आणि उडीद डाळ ३: १ या प्रमाणात वेगवेगळे भिजत घाला.
उडदाच्या डाळीमध्ये १ टीस्पून मेथ्या आणि २ टेबलस्पून हरबरा डाळ सुद्धा भिजत घाला. यामुळे इडल्या जास्त मऊ होतात.
डाळ आणि तांदूळ ६ ते ७ तास भिजल्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घ्या आणि ८ ते १० तास आंबविण्यासाठी ठेवून द्या. सध्या थंडीचे दिवस असल्याने इडलीचे पीठ आंबण्यासाठी तेवढा वेळ लागतोच.
त्यानंतर पीठ व्यवस्थित आंबवले गेले की पालकाची फ्रेश पाने स्वच्छ धुवून घ्या. ती बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यातच २ ते ३ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि १ टीस्पून आलं- लसूण पेस्ट घाला. सगळं मिश्रण बारीक वाटून घ्या आणि ही प्युरी इडलीच्या पिठामध्ये घाला.
आता पालकाची प्युरी आणि इडलीचं पीठ व्यवस्थित मिक्स करा आणि नेहमीप्रमाणे इडल्या लावून टाका. चटकदार खमंग पालक इडली तयार..