करा स्वयंपाकाच्या गॅसची बचत! स्वयंपाक करताना १० चुका टाळा, पैसे वाचवा दरमहा आणि व्हा सुपरस्मार्टं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2026 11:00 IST2026-03-03T11:00:00+5:302026-03-03T11:00:02+5:30
Gas saving tips while cooking : cooking gas saving hacks : महिनाभर वापरूनही होईल गॅसची बचत! स्वयंपाक करताना चुका टाळा - वाया न जाता पुरेल १५ दिवस जास्त...

smart cooking tips to save gas
आजच्या वाढत्या महागाईच्या काळात घरगुती खर्च सांभाळताना गॅस सिलेंडरचा वाढता (Gas saving tips while cooking) खर्च अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. रोजच्या स्वयंपाकात नकळत काही सवयींमुळे गॅस जास्त खर्च होतो आणि सिलेंडर लवकर संपतो. मात्र स्वयंपाक करताना काही सोप्या आणि स्मार्ट किचन टिप्स वापरल्या तर गॅसची मोठ्या प्रमाणात बचत करता येते. योग्य भांडी निवडण्यापासून ते स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत छोटे बदल केल्यास वेळ, ऊर्जा आणि पैसे तिन्ही वाचू शकतात.स्वयंपाक करताना गॅस कसा वाचवायचा यासाठी उपयुक्त टिप्स पाहूयात...

१. भिजवण्याची सवय (Soaking) :-
डाळ, तांदूळ किंवा कडधान्ये शिजवण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे दाणे मऊ होतात आणि शिजण्यासाठी कमी वेळ लागतो. त्यामुळे गॅसचा वापर कमी होऊन साधारण २०–२५% पर्यंत गॅसची बचत होते. शिवाय अन्न लवकर शिजल्यामुळे त्यातील पोषक घटकही अधिक प्रमाणात टिकून राहतात.

२. झाकण ठेवून शिजवणे (Cover & Cook) :-
भाजी, आमटी किंवा कोणताही पदार्थ शिजवताना नेहमी भांड्यावर झाकण ठेवून शिजवा. झाकणामुळे उष्णता आणि वाफ भांड्याच्या आतच टिकून राहते, त्यामुळे अन्न लवकर शिजते. यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळही वाचतो.

३. पाण्याचे योग्य प्रमाण (Less Water) :-
स्वयंपाक करताना आवश्यक तेवढंच पाणी वापरण्याची सवय लावा. गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यास ते उकळण्यासाठी अधिक वेळ आणि गॅस खर्च होतो. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास पदार्थ लवकर शिजतो आणि गॅसची बचतही होते.

४. प्रेशर कुकरचा वापर (Pressure Cooker) :-
शक्य असेल तिथे स्वयंपाकासाठी प्रेशर कुकरचा वापर करा. कुकरमध्ये तयार होणाऱ्या वाफेच्या दाबामुळे अन्न कमी वेळेत आणि समान उष्णतेत शिजते. त्यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि वेळेचीही मोठी बचत होते.

५. मंद आचेचा नियम (Low Flame Rule) :-
पदार्थाला एकदा उकळी आली की गॅसची आच लगेच मंद करा. सतत मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्यास गॅस जास्त खर्च होतो, पण अन्न लवकर शिजत नाही. मंद आचेवर पदार्थ व्यवस्थित शिजतो आणि गॅसचीही चांगली बचत होते.

६. तयारी आधी, गॅस नंतर (Prep First) :-
स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी भाजी चिरणे, धुणे, सोलणे किंवा मसाले तयार ठेवणे अशी सर्व तयारी आधी पूर्ण करा आणि त्यानंतरच गॅस पेटवा. गॅस चालू ठेवून तयारी केल्यास अनावश्यक गॅस वाया जातो. आधी तयारी केल्याने वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होते.

७. कोरडी भांडी (Wipe Utensils) :-
भांडे गॅसवर ठेवण्यापूर्वी ते खालच्या बाजूने नीट पुसून कोरडे करा. भांड्याखाली पाणी किंवा ओलावा असल्यास ते आधी सुकण्यासाठी अतिरिक्त उष्णता लागते, त्यामुळे गॅस जास्त खर्च होतो. कोरडी भांडी वापरल्यास उष्णता थेट भांड्याला मिळते आणि गॅसची बचत होते.

८. फ्रीजमधील पदार्थ (Thawing) :-
फ्रीजमधून काढलेले पदार्थ थेट गॅसवर गरम करू नका. आधी ते काही वेळ रूम टेंम्परेचरला येऊ द्या आणि नंतरच गरम करा. खूप थंड पदार्थ गरम करण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस लागतो, त्यामुळे आधी नैसर्गिकरित्या तापमान सामान्य होऊ दिल्यास गॅसची बचत होते.

९. गॅसची ज्योत निळी असावी (Blue Flame) :-
गॅस पेटवल्यानंतर ज्योत निळ्या रंगाची दिसणं योग्य मानलं जातं. जर ज्योत पिवळी (Yellow) दिसत असेल तर बर्नरमध्ये घाण किंवा अडथळा असण्याची शक्यता असते. अशावेळी बर्नर स्वच्छ करा, कारण पिवळ्या ज्योतीमुळे गॅस पूर्णपणे जळत नाही आणि अनावश्यक गॅस वाया जातो. निळी ज्योत असल्यास गॅसचा वापर कार्यक्षमपणे होतो आणि बचतही होते.

१०. योग्य आकाराचं भांडं वापरा (Right Size Utensils) :-
गॅसच्या ज्वालेपेक्षा खूप लहान किंवा खूप मोठं भांडं वापरणं टाळा. भांड्याचा तळ ज्वालेच्या आकाराइतका असल्यास उष्णता थेट अन्नाला मिळते आणि गॅस वाया जात नाही. योग्य आकाराचं भांडं वापरल्याने पदार्थ लवकर शिजतो आणि गॅसची बचत होते.

















