उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी खा १० पदार्थ - उन्हाळा होईल सुखकर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 17:39 IST2026-03-16T17:29:12+5:302026-03-16T17:39:21+5:30
cooling foods for body heat : foods to reduce body heat : how to reduce body heat naturally : उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवणारे १० नॅचरल कूलिंग पदार्थ आहेत बेस्ट....

cooling foods for body heat
उन्हाळ्याचा सिझन सुरु झाला की, या प्रखर उन्हाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत केवळ बाहेरील तापमानच वाढत नाही, तर आपल्या शरीराची अंतर्गत उष्णताही वाढते. यामुळे मग हातापायांची आग होणे, डोळे जळजळणे, पित्त वाढणे, घामोळी किंवा उष्णतेचे फोड येणे अशा समस्या डोकं वर काढतात. अनेकदा आपण फक्त थंड पाणी पिऊन समाधान मानतो, पण शरीराला आतून थंडावा देण्यासाठी केवळ पाणी पुरेसे नसते. निसर्गाने आपल्याला असे काही पदार्थ दिले आहेत, जे खाल्ल्याने आपण उन्हाळ्यातही स्वतःला फ्रेश आणि कूल ठेवू शकतो. शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत ते पाहूयात... (how to reduce body heat naturally).

१. सब्जा बिया (Sabja Seeds) :-
सब्जा बिया नैसर्गिकरित्या थंड असतात. अर्धा चमचा सब्जा बिया पाण्यात भिजवून ते पाणी, लिंबू सरबत किंवा दुधात मिसळून प्यायल्याने पोटातील जळजळ आणि उष्णता कमी होते.

२. आवळा (Amla) :-
आयुर्वेदात आवळ्याला 'पित्तशामक' मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत आवळा खाल्ल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. उष्णता आणि पित्त कमी करण्यासाठी आवळा हे आयुर्वेदातील एक उत्तम 'अमृतफळ' आहे. आवळ्यातील थंड गुणधर्म शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करतो. आवळ्याचा रस, चूर्ण किंवा ज्यूस रिकाम्या पोटी घेतल्यास उन्हाळ्यात शरीर थंड राहते

३. जिरे (Cumin Seeds) :-
जिऱ्याचे पाणी हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. जिरे अत्यंत थंड असते. रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकावे. सकाळी हे पाणी पिण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

४. मनुका (Raisins) :-
रोज रात्री १०० ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवावेत. सकाळी उठल्यानंतर हे मनुके चावून खावेत आणि ते पाणीही प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

५. पुदिना (Mint) :-
उन्हाळ्यामध्ये शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला आतून थंडावा देण्यासाठी पुदिना अत्यंत गुणकारी मानला जातो. पुदिन्यामध्ये मेंथॉल असते, जे शरीराचे तापमान कमी करण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. पुदिन्याचे सरबत/पाणी, पुदिना ताक, पुदिना चहा, पुदिना चटणी याचा समावेश आहारात करा.

६. शहाळ्याचे पाणी (Coconut Water) :-
उष्णता कमी करण्यासाठी शहाळ्याचे पाणी हा सर्वोत्तम उपाय आहे. यात इलेक्ट्रोलाईट्स भरपूर असतात, जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवतात आणि थंडावा देतात.

७. कोकम (Kokum) :-
उन्हाळ्यातील उष्णता, पित्त आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोकम सरबत हा एक नैसर्गिक आणि फायदेशीर उपाय आहे. हे शरीराला थंडावा देते, डिहायड्रेशन टाळते आणि पचनक्रिया सुधारते. कोकम आगळ, साखर/गूळ, जिरं पूड, काळं मीठ आणि पुदिना वापरून हे घरगुती पेय बनवता येते.

८. कलिंगड आणि टरबूज (Watermelon & Muskmelon) :-
या फळांमध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीराला हायड्रेशन मिळते आणि उष्णतेमुळे होणारा थकवा दूर होतो.

९. काकडी (Cucumber) :-
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती फायबरने समृद्ध असते. रोजच्या सॅलॅडमध्ये काकडीचा वापर केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.

१०. गुलकंद (Gulkand) :-
उन्हाळ्यात रोज सकाळी एक चमचा गुलकंद खाणे अतिशय फायदेशीर ठरते. हे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले असल्याने पित्त आणि उष्णतेवर रामबाण उपाय आहे.

११.दही आणि ताक (Curd & Buttermilk) :-
दुपारच्या जेवणात एक ग्लास ताक किंवा वाटीभर दही नक्की घ्या. ताकात थोडे जिरे पूड आणि काळं मीठ टाकल्यास ते पचनासाठी उत्तम ठरते आणि शरीरातील उष्णता पटकन बाहेर काढते.

















