भुमी पेडणेकर सांगतेय वेटलॉस सिक्रेट, म्हणते चित्रपटांसाठी वजन वाढवणं- कमी करणं आता पुरे, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 17:03 IST2026-04-01T16:41:39+5:302026-04-01T17:03:18+5:30

अभिनेत्री भुमी पेडणेकर ही अतिशय गुणी आणि हुशार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनय केवळ वरवरच करायचा नाही, तर त्या भुमिकेत शिरून ती जगायचं हे खऱ्या कलाकाराचं कौशल्य असतं. भुमीचंही तसंच आहे.

त्यात आपण पाहिलंच आहे की 'दम लगाके हैशा' या चित्रपटासाठी तिने तब्बल ३० किलो वजन वाढवलं होतं. चित्रपटातल्या तिच्या भुमिकेचं त्यावेळी भरभरून कौतूकही झालं.

आता अभिनेत्री असल्याने एवढं वजन कायम ठेवणं तिच्या करिअरसाठी आणि तब्येतीसाठीही चांगलं नव्हतंच. त्यामुळे तिने पुन्हा डाएटला सुरुवात केली आणि पुढच्या काही महिन्यांतच तब्बल ३५ किलो वजन घटवलं. यावेळी तिच्यामध्ये झालेला बदल कमालीचा होता.

नंतर पुन्हा काही भुमिकांसाठी तिला थोडं फार वजन वाढवावं लागलं आणि कमी करावं लागलं. पण नुकत्याच सोहा अली खानसोबत झालेल्या पॉडकास्टमध्ये भुमी म्हणते की आता अभिनयासाठी अशा पद्धतीने वजन वाढवणं आणि कमी करणं आपण थांबवलं आहे.

कारण आता तिचा फोकस तिच्या तब्येतीवर आहे. ती म्हणते की एक ठराविक वय झाल्यानंतर कोणत्याही स्त्रीसाठी एवढ्या झपाट्याने आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वजन वाढवणं आणि कमी करणं तिच्या तब्येतीच्या दृष्टीने चांगलं नाहीच. त्यामुळे आता आरोग्य जपण्याकडे भुमीचा कल आहे.

भुमीने या पॉडकास्टमध्ये असंही सांगितलं आहे की इंजेक्शन्स घेऊन किंवा कोणतेही कृत्रिम उपाय करून ती वजन वाढवत किंवा कमी करत नाही. तर तिचा मुख्य भर हा तिच्या आहारावर आणि व्यायामावरच असतो.