ऊन वाढताच अस्वस्थ होतंय, शरीरातली उष्णता वाढली? 'हे' पदार्थ खा, उन्हाळ्यातही वाटेल एकदम कूलकूल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 18:16 IST2026-03-21T18:08:46+5:302026-03-21T18:16:53+5:30

उन्हाचा पारा वाढला की जीव अगदी नकोसा होऊन जातो. सतत पाणी प्यावं वाटतं. त्यामुळे मग पोट फुगल्यासारखं होतं. जेवण नकोसं वाटतं. असं झालं की मग आपोआपच डिहायड्रेशनचा त्रास होतो. गळून गेल्यासारखं होतं.

काही जणांना ऊन वाढल्यावर उन्हाळी लागण्याचा त्रास होतो. डोळ्यांची, तळपायाची जळजळ होते. शरीरातली उष्णता वाढली की हे सगळे त्रास सुरू होतात. असे त्रास सुरू झाल्यास काय खायला हवं जेणेकरून शरीर थंड राहण्यास मदत होऊ शकते, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी garbhaostavpathway या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

त्यापैकी पहिला उपाय म्हणजे सकाळच्या वेळी १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा सब्जा घालून पाणी प्या. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते.

दुपारच्या जेवणात १ ग्लास ताक अवश्य घ्या. ताकामुळे डिहायड्रेशन होत नाही. अन्नपचनही चांगले होते.

दुपारी ४ ते ५ वाजता चहा, कॉफी असे गरमागरम पदार्थ घेण्याऐवजी कैरीचं पन्हं, कोकम सरबत किंवा मग लिंबू सरबत प्या. बरं वाटेल.

रात्री झोपण्यापुर्वी गरम दुधामध्ये तूप घालून प्यायल्यानेही शरीराला बऱ्यापैकी बरं वाटतं...

याशिवाय आठवड्यातून दोन वेळा नारळपाणी प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलेंस राहातो आणि डिहायड्रेशन होत नाही.

















