World Cancer Day: महिलांना ४ प्रकारच्या कॅन्सरचा सगळ्यात जास्त धोका, 'ही' दुखणी अंगावर काढणं जिवावर बेतेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 16:55 IST2026-02-04T16:49:14+5:302026-02-04T16:55:46+5:30

कॅन्सरचे रुग्ण सगळीकडेच खूप वाढत आहेत. या आजाराविषयी जनजागृती होण्यासाठीच ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून ओळखला जातो.

आता फक्त महिलांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणे, त्रास होत असला तरी तो अंगावर काढणे अशी सवय बहुसंख्य महिलांना असते आणि कॅन्सरच्या बाबतीत तेच नेमके जीवावर बेतणारे ठरते.

म्हणूनच महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे कॅन्सर कोणते आणि त्याची लक्षणं नेमकी काय आहेत ते पाहूया..

सगळ्यात पहिला आहे सर्व्हायकल कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरपेक्षाही त्याचे प्रमाण वाढत आहे. स्वच्छतेची उणीव हे या कॅन्सरचे सगळ्यात मोठे कारण मानले जाते. पोटात सतत दुखणे, पाळी झाल्यानंतरही रक्तस्त्राव होणे, संबंधाच्यावेळी वेदना, अंगावरून खूप पांढरे पाणी जाणे ही काही त्याची लक्षणं आहेत. त्याकडे लक्ष ठेवा.

दुसरा कॅन्सर आहे स्तनाचा. हा कॅन्सर बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक मानला जातो. स्तनामध्ये गाठ येणे हे याचे सगळ्यात पहिले लक्षण आहे. त्यामुळे दर महिन्याला मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी प्रत्येक महिलेने घरच्याघरी स्वस्तन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वेळीच निदान झाले तर पुढची उपचार पद्धती बरीच सोपी होते.

ओव्हरीचा कॅन्सरही महिलांमध्ये वाढत आहे. या आजाराची लक्षणं खूप वेगळी आहेत. ओव्हरी म्हणजेच अंडाशयाचा कॅन्सर असणाऱ्या महिलांना ब्लोटिंग, अपचन, जेवण कमी होणे असे त्रास सुरुवातीच्या काळात जाणवतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग आजार वाढतो. आजाराचं लवकर निदान होत नाही.

ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाणही खूप वाढते आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांना करावा लागणारा चुलीवरचा स्वयंपाक. धूर, धूळ, प्रदुषित हवा, श्वासावाटे शरीरात जाणारे केमिकल्स, रसायनं, स्मोकिंग यामुळे हा कॅन्सर होण्याचा धोका वाढत जातो.

















