लग्नाचा निर्णय घेताय? मग ओबामांनी सांगितलेलं हे तीन प्रश्न स्वत:ला विचारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 15:17 IST2018-09-03T15:12:18+5:302018-09-03T15:17:06+5:30

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो. लग्नाचा निर्णय कधी घ्यायचा, हे अनेकांना समजत नाही. एखादी व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही, हे ठरवणं अनेकांना अवघड जातं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांचे विचार अशा सर्वांसाठी मोलाचे ठरु शकतील.
बराक ओबामा यांना परिचयाची आवश्यकता नाही. अतिशय सामान्य घरात जन्मलेले ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. यात त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. लग्न करताना प्रत्येकानं स्वत:ला फक्त तीन प्रश्न विचारावेत, असं ओबामांनी म्हटलं होतं.
यातील पहिला प्रश्न म्हणजे, ती व्यक्ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते का? एखाद्या व्यक्तीसोबत खूप काळ राहिल्यानं अनेकजण बोअर होतात. त्यामुळेच हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.
दुसरा प्रश्न म्हणजे, ती व्यक्ती तुम्हाला हसवते का? आयुष्यात संकटं खूप येतात. मात्र या संकटांनी घाबरुन जाता कामा नये. आयुष्यात रडण्यासाठी खूप कारणं मिळतील. मात्र आपण हसण्याची कारणं शोधायला हवीत, असं म्हणतात. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती तुम्हाला सतत हसवत ठेवत असेल, तर तुम्ही आयुष्याचा जोडीदार म्हणून त्या व्यक्तीचा विचार करु शकतात.
तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ती एक उत्तम आई होऊ शकते का? पुढे जाऊन तुम्ही मुलांचा विचार करणार असाल, तर हा प्रश्न महत्त्वपूर्ण ठरतो. कारण भविष्याच्या दृष्टीनं हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. ती उत्तम आई होऊ शकते, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते तुमच्या भविष्यातील कुटुंबाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम असेल.