व्हॅलेंटाईन विकमध्ये पुढील चुका प्रकर्षाने टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:54 PM2021-02-08T14:54:36+5:302021-02-08T16:17:23+5:30

प्रेम व्यक्त करायला ठराविक दिवसाची गरज नाही, परंतु व्हॅलेंटाईन विक आला, की प्रेमसागराला जणू उधाणच येते. प्रेमवीर आपल्या प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी या सप्ताहातील सर्व दिवसांचे आवर्जून पालन करतात. परंतु, अतिउत्साहाच्या नादात कळत नकळत काही चुका घडतात. परिणामी होकार नकारात बदलू शकतो आणि तो क्षण आयुष्यभरासाठी वेदनादायी ठरतो. असा पश्चात्तापाचा क्षण तुमच्या वाट्याला येऊ नये, असे वाटत असेल, तर पुढील चुका प्रकर्षाने टाळा.

'प्रेमाचा गुलकंद ' या कवितेतून आचार्य अत्रे यांनी प्रेमवीरांना मोठा धडा दिला आहे. नुसते गुलाब देत राहिलात, तर भविष्यात तुमच्या वाट्याला गुलकंद येईल, पण गुलकंदाची बरणी दुसराच घेऊन जाईल. म्हणून तुमच्या प्रेमफुलाला गुलाबाचे पुष्प जरूर द्या, परंतु ते का दिले आहे, याची नीट जाणीवही करून द्या. तिला या दिवशी शेकडो गुलाब मिळाले, तरी तुम्ही दिलेले गुलाब डायरीच्या पानांमध्ये ती जतन करून ठेवेल, अशी जादू तुमच्या प्रेमात असली पाहिजे. गुलाब देताना एखादी चारोळी करता आली तर उत्तम, नाहीतर प्रेमगीतांचा, प्रेमकवितांचा आधार घ्या आणि शब्दफुलांची जोड देत रोज डे साजरा करा.

गुलाब देताना तिच्या नजरेत तुम्हाला पुढे जायचे की नाही, याचा सिग्नल मिळेल. गुलाबाची लाली तिच्या गालावर उमटली आणि डोळ्यात बदाम दिसू लागले, तर दुसऱ्या दिवशी पूर्ण तयारीने तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करा. उगीचच इंग्रजाळलेले शब्द न वापरता अस्सल मराठी तडका देत प्रेम व्यक्त करा. तिला मराठमोळी मागणी नक्कीच आवडेल आणि लक्षातही राहील. आडून आडून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा थेट केलेले प्रपोजल मुलींना जास्त भावते. कुसुमाग्रज म्हणतात, 'प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं...!'

शेवट गोड तर सगळंच गोड! पण होकार मिळाला, की कसला आलाय शेवट? ती तर खरी सुरुवात. प्रेमाची, अतुट नात्याची. मग त्या नात्यात गोडवा पेरायला नको? अशा वेळी नात्यात मिठ्ठास भरायला चॉकलेटपेक्षा आणखी चांगली भेट काय असू शकते? प्रेम नवं नवं असेल, तर उगीच एका चॉकलेटमध्ये भागिदारी करायला जाऊ नका. अतिघाई खड्यात नेई! तिला स्वतंत्र चॉकलेट द्या. तिने जर तिच्यातल्या चॉकलेटची भागिदारी केली, तर भावी चॉकलेटी आयुष्याची ती खूण आहे, असे समजून जा!

व्हॅलेंटाईनचे लोण आपल्या देशात पसरलेले असले, तरी सगळ्याच बाबतीत अनुकरण करणे योग्य ठरणार नाही. कारण देशी आणि परदेशी मुलींची आवड निवड यात खूप तफावत आहे. त्यामुळे, टेडी डे निमित्त तुम्ही उत्साहात 'टेडी' घेऊन जाल, पण ती ते गिफ्ट `बेअर' करू शकेल, याची काही खात्री नाही. त्याऐवजी तिला आवडेल अशी छान भेटवस्तू द्या. कानातले, गळ्यातले, पर्स, ड्रेस, टॉप असे शेकडो पर्याय तुम्हाला सापडतील.

प्रेमात पडल्यावर एक दुजे के लिए शेकडो आणाभाका घेतल्या जातात. त्याचा ऑफिशियल डे म्हणजे प्रॉमिस डे. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला प्रेमाबाबत किती एकनिष्ठ आहोत आणि हे नाते किती दृढपणे जपून ठेवणार आहोत, हे सांगण्याचा दिवस. शाब्दिक दिलासा फार महत्त्वाचा असता़े प्रेमाचे नाते त्यावरच तग धरून असते. 'जो वादा किया निभाना पडेगा' ही जाणीव दोघांना राहते आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतात.

अर्थात आलिंगन दिवस, जादु की झप्पी चा दिवस. प्रेमात पडल्यावर सगळ्यात ऊबदार स्पर्श असतो, तो म्हणजे जोडीदाराच्या मिठीचा! मी तुझाच आहे किंवा मी तुझीच आहे, हे शब्दातून व्यक्त न करता केवळ स्पर्शातून भावना पोहोचवण्याचे हे माध्यम. `तुम देना साथ मेरा ओ हमनवा' ही प्रेमळ भाषा फक्त आलिंगनातून पोहोचवता येते. फक्त त्यात कुठेही वासनेचा लवलेश नसून फक्त प्रेमळ स्पर्श असावा.

हा दिवस म्हणजे प्रेमसप्ताहाचा उच्चांक. परंतु, यात जेवढे थ्रिल आहे, तेवढीच रिस्क! मनाविरूद्ध केलेला स्पर्श, तुमच्या प्रेम सप्ताहाच्या रंगाचा बेरंग करू शकतो. म्हणून हा क्षण अनुभवण्याची घाई न करता, जोडीदाराला मोकळीक द्या. थोडा संयम ठेवा. प्रेम उमलू द्या. किस डे साजरा करायचा असेल, तर प्रेयसीच्या कपाळावर किस करून तिला तुमच्या प्रांजळ प्रेमाची हमी द्या. तिला ही भेट नक्कीच आवडेल.

आठवडाभर प्रेम व्यक्त करून प्रेमाचा सोहळा साजरा करायचा, तो केवळ या दिवसापुरता नाही, तर आयुष्यभरासाठी! प्रेमाचा आलेख आगामी वर्षात आणखी उंचावत राहील, याची काळजी दोघांनी घ्यायची. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, `प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं' असे कितीही म्हटले, तरी प्रत्येकाची प्रेमकथा निराळीच! ती आणखी रोचक, आनंददायी कशी बनवायची, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.