पोलिसांनी 'या' पत्राची दखल घेतली असती, तर बलात्काराची घटना घडलीच नसती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:54 IST2025-02-27T13:43:17+5:302025-02-27T13:54:45+5:30

पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकावर तरुणीसोबत झालेल्या अत्याचारानंतर सुप्रिया सुळे यांनी आगरप्रमुखांनी पोलिसांना लिहीलेलं पत्र समोर आणलं.

पुण्यातील स्वारगेट बसस्थाकामध्ये बुधवारी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर नेहमीच प्रवाशांची गर्दी असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात हा सगळा प्रकार कसा घडला असा सवाल विचारला जात आहे. तपासानंतर बस स्थानकातल्या अनेक बसेसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याचे समोर आलं.

प्रवाशांची आणि एसटीच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र बस स्थानकाच्या परिसरात सराईत गुन्हेगारांचा सुळसुळाट असल्याचे अनेकदा समोर आलं होतं. स्वारगेट आगारप्रमुखांनी ही बाब पोलिसांना देखील कळवली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळे यांनी हे पत्र एक्सवर पोस्ट करुन कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे.

"स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने गंभीर प्रश्न उभा राहिले आहेत. स्वारगेट आगारप्रमुखांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला बस स्थानकावर खासगी एजंट आणि इतर असामाजिक तत्वांचा त्रास होत असून यावर कारवाई करावी असे पत्र दिले आहे," असं सुप्रिया सुळेंनी सांगिते.

परंतु तरीही पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. स्वारगेट बस स्थानक हे कायम वर्दळीचे ठिकाण असून येथे पोलीस यंत्रणा अधिक सजग असण्याची गरज आहे. परंतु जर आगारप्रमुखांनी पत्र लिहूनही त्याची दखल घेतली जात नसेल तर ते अतिशय खेदजनक आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेच्या संदर्भाने तसेच बस स्थानकाच्या सुरक्षेच्या संदर्भाने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

खाजगी एजंट आणि तृतीय पंथी आगारमध्ये येऊन प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांवर दमदाटी करत असल्याची तक्रार आगार प्रमुखानी पत्राद्वारे केली होती. आगारात तृतीयपंथी लोकांची दमदाटी वाढली आहे. हे लोक मध्यपान करून, अतिशय गलिच्छ आणि घाणेरडे पेहरावामध्ये आहोरात्र आगारामध्ये वावरत असतात. प्रवाशांची गर्दी पाहून तृतीयपंथी महिला, वृद्ध प्रवाशी, लहान मुले यांना स्पर्श करून जबरदस्ती करून पैसे घेतात, असं या पत्रात म्हटलं.

खाजगी एजंट हे बसस्थानक परिसरामध्ये येऊन, गाडीतून, रांगेतून प्रवाशी ओढून नेतात व त्यांना खाजगी गाडीतून प्रवास करण्यास बोलतात. या बाबतीत त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी. याबाबत अगोदर ही अनेकदा पत्रव्यवहार आलेला आहे. परंतु अ‌द्यापर्यंत कोणतीही कारवाई अथवा यांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली नाही, असेही या पत्रात म्हटलं.