Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदेची संपत्ती किती?; अंबानी-अदानी सोडा, काही राज्यांचे बजेट होईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 04:57 PM2021-07-10T16:57:25+5:302021-07-10T17:02:16+5:30

Jyotiraditya Scindia Property: केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची संपत्ती किती? याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण १९५७ पासून आतापर्यंत शिंदे राजघराण्याच्या उमेदवारांनी जेवढी संपत्ती दाखविली, ते आकडे सामान्यांच्या माहितीनुसार खूप कमी आहेत.

ग्वाल्हेर : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची संपत्ती किती? याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण १९५७ पासून आतापर्यंत शिंदे राजघराण्याच्या उमेदवारांनी जेवढी संपत्ती दाखविली, ते आकडे सामान्यांच्या माहितीनुसार खूप कमी आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणुकीवेळी जेवढी संपत्ती आयोगाला सांगितली, ती दोन अब्जांहून अधिक होती. मात्र, अशा अनेक मालमत्ता आहेत ज्यांचे कोर्टात खटले सुरु आहेत. त्यांची अंदाजे किंमत ही ४० हजार कोटी म्हणजेच ४०० अब्ज रुपये होते.

शिंदे घराण्याच्या मालमत्तांवरूनचा वाद हा राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जमान्यापासूनच सुरु झाला होता. हा वाद राजमातांच्या दोन मृत्यूपत्रांवरून सुरु झाला आहे. राजमातांनी या मृत्यूपत्रांमध्ये आपल्या संपत्तीतून मुलगा माधवराव शिंदे आणि नातू ज्योतिरादित्य यांना बेदखल केले होते.

यातील एक हिस्सा त्य़ांनी तीन मुलींना- उषा राजे, वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे यांच्या नावावर केला होता. माधवराव हयात असताना ते कायदेशीर लढाया लढत होते. आता त्यांच्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे ते काम करत आहेत. दुसऱ्या बाजुला ज्योतिरादित्य यांच्या तीन आत्या आहेत.

१९८४ च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या आधारे शिंदे परिवालाच्या साऱ्या मालमत्ता या विजयाराजे आणि एकुलते एक पूत्र माधवराव यांच्यात निम्म्या निम्म्या वाटण्यात आल्या होत्या.

राजमातांकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती. राजमाता यांचे वडील जिवाजी राव शिंदे यांनी कोणतेही मृत्यू पत्र केले नव्हते. माधवराव आणि राजमाता यांच्यात संपत्तीवरून वाद झाल्यानंतर न्यायालयाने ही व्यवस्था केली होती.

1990 मध्ये माधवरावांनी ग्वाल्हेरच्या न्यायालयात याचिका दाखल करत शिंदे राजघराण्याच्या संपत्तींमध्ये एकमेव वारस असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण आता न्यायालयात पेंडिंग आहे. कारण राजमांतांच्या तीन मुली हा दावा योग्य नसल्याचे म्हणत आहेत.

या मृत्यूपत्राद्वारे राजमाता यांनी माधवरावांना आणि त्यांचा नातवाला बेदखल केले होते. यामध्ये त्यांनी दोन तृतियांश संपत्ती मुलींच्या नावे तर एक तृतियांश हिस्सा हा एका ट्रस्टद्वारे चॅरिटीसाठी दिला होता.

राजमातांच्या वकिलांनी 2001 मध्ये दुसरे मृत्यूपत्र सादर केले. यामध्ये राजमातांनी त्यांची सारी संपत्ती त्यांच्या तीन मुलींच्या नावे लिहीली होती. न्यायालय आता या मृत्यूपत्राची वैधता तपासत आहे.

उषा राजे, वसुंधरा राजे आणि यशोधरा या काही सहजासहजी मालमत्तांवरील हक्क काही सोडताना दिसत नाहीएत. नाही ज्योतिरादित्य मागे हटत आहेत. महत्वाचे म्हणजे दोन्ही पक्ष सार्वजनिकरित्या यावर भाष्यही करत नाहीत.