राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेची उडी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आदित्यकडे VI'MP' जबाबदारी

By प्रविण मरगळे | Published: October 8, 2020 06:44 PM2020-10-08T18:44:45+5:302020-10-08T18:52:45+5:30

काँग्रेसमधून ज्योतिरादित्य शिंदे बाहेर पडत भाजपा प्रवेश केला, त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं, सरकार कोसळल्यानंतर मध्यप्रदेशात भाजपाने सत्तास्थापन केली, मुख्यमंत्रिपदी शिवराजसिंह चौहान विराजमान झाले.

मध्य प्रदेशात ज्या बंडखोर काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक आहे, या जागांच्या निवडणुकीसाठी बसपानंतर शिवसेनाही भाजप-काँग्रेसला आव्हान देण्याच्या मनस्थितीत आहे.

राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मदतीने शिवसेनेने मध्य प्रदेशात पाय पसरण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांना खास जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांवर शिवसेनेचे विशेष लक्ष आहे.

‘पत्रिका’च्या वृत्तानुसार आदित्य ठाकरे यांची टीम मध्य प्रदेशात सर्वेक्षण करीत असून यानंतर २८ जागांपैकी किती जागांवर उमेदवार उभे करायचं याचा निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बिहार, मध्य प्रदेशात उमेदवार देण्याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे.

मालवा-निमार विधानसभा जागेवर शिवसेनेची नजर आहे. हा परिसर महाराष्ट्राच्या सीमेशी जोडलेला आहे. मराठी मतदारही इथे मोठ्या संख्येने आहेत. हे पाहता मालवा-निमार, आगर, हातपीपलिया, नेपानगर, सांवेर, मांधाता, बदनावर आणि सुवासारा या जागांवरही शिवसेना सर्वेक्षण करीत आहे.

याच बरोबरच ग्वाल्हेर-चंबळमधील काही जागांवरही शिवसेनेचे लक्ष लागून आहे. ग्वाल्हेर-चंबळमध्ये भाजप-कॉंग्रेसशिवाय इतरांनाही मोठ्या प्रमाणात मते मिळाली. सूत्रांनुसार निवडणूक जिंकण्याऐवजी पक्ष संघटना मजबूत करण्याचा उद्धव ठाकरे यांचा हेतू आहे. पोटनिवडणुकीद्वारे हे समजेल की पक्षाचा पाया किती मजबूत आहे आणि किती मेहनत घ्यावी लागेल.

तसेच शिवसेनेचे नेते पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये जाऊ शकतात. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह अनेक मोठ्या चेहर्‍यांचा समावेश असू शकतो.

दरम्यान बिहार निवडणुकीसाठीही शिवसेनेने कंबर कसली आहे, याठिकाणी ५० जागांवर शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. तर सुशांत प्रकरणात ज्या डीजीपींनी महाराष्ट्राची बदनामी केली त्यांच्याविरोधातही उमेदवार उतरवणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मात्र बिहारमध्ये शिवसेनेला महाराष्ट्रासारखं धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही, कारण जेडीयूने यावर आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाने धनुष्यबाण वगळता इतर चिन्हावर निवडणूक लढवावी असे आदेश शिवसेनेला दिले आहे. कारण जेडीयू आणि शिवसेनेच्या चिन्हात साधर्म्य आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेने सत्ता काबीज केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेरच्या राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत, शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे पंतप्रधानाच्या शर्यतीत असतील असं विधान केले होते, त्याचीच तयारी सध्या शिवसेनेकडून सुरु आहे का? अशी चर्चा सुरु आहे.