Pooja Chavan Suicide Case: “राजीनाम्यापूर्वी राठोडांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिवसेनेत ‘मातोश्री’बाह्य सत्ताकेंद्रे उभी राहिली आहेत का?”

By प्रविण मरगळे | Published: March 1, 2021 08:42 PM2021-03-01T20:42:55+5:302021-03-01T20:47:48+5:30

Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray: संजय राठोड प्रकरणात राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विलंब केला, त्यात राठोडांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे शिवसेनेचे संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) अडचणीत आले, विरोधकांच्या दबावामुळे संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, पूजाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संजय राठोड गोत्यात आले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड १५ दिवस बेपत्ता झाले, त्यांनी कुठेही आपली बाजू समोर येऊन मांडली नाही, त्यामुळे राठोड यांच्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर अचानक संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करत आपली बाजू मांडली.

पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करताना संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) ४८ तासांपूर्वी केलेल्या आवाहनाचीही आठवण राहिली नाही, कोरोना काळात गर्दी जमवू नका, या आदेशाला संजय राठोडांनी केराची टोपली दाखवली.

संजय राठोड यांच्या प्रकरणात जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला, समाजाआडून संजय राठोडांनी या प्रकरणातून निसटण्याचा प्रयत्न केला, मंहत आणि इतर माध्यमातून संजय राठोड यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसेनेचा दमदार मंत्री वगळता इतर कोणीही राठोडांच्या मदतीला पुढे आलं नाही.

संजय राठोड यांच्या प्रकरणात विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली, एकामागोमाग एक येत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडली, विरोधकांचा वाढता दबाव आणि सरकारवरविरोधात तयार होत असलेलं वातावरण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आली.

नैतिकतेच्या मुद्द्यावर संजय राठोड यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जात असलं तरी पूजाच्या मृत्यूनंतर इतके दिवस संजय राठोड गप्प का होते? आतापर्यंत त्यांनी राजीनामा का दिला नाही? पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करून राठोडांनी नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला का? हे असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहतात.

यातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पाचारण करण्यात आले, याठिकाणी अनिल परब, अनिल देसाई, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते, शेवटपर्यंत राठोडांनी राजीनामा घेऊ नये यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना यश आलं नाही अशी माहिती आहे.

यातच पोहरादेवी गडावरील मंहतांसोबत बोलण्याची विनंतीही संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार दिला, यातच एकनाथ शिंदे यांनीही संजय राठोडांचा राजीनामा घेऊ नये यासाठी प्रयत्न केले परंतु मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यातच भाजपाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलंय की, राजीनामा देतो, पण पोहरादेवीच्या मंहतांशी आधी बोला, असं राठोड यांचे म्हणणं होतं, मुळात शिवसेनेत अशी मातोश्रीबाह्य सत्ताकेंद्रे उभी राहिली आहेत असा याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने घ्यायचा का? असा सवाल भाजपाने केला आहे.

शिवसेनेत आजपर्यत मातोश्रीहून आदेश निघाला की, त्यात कुठलाही बदल होत नाही, त्याच्याविरोधात कुणीही भाष्य करत नाही, मात्र संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेला विलंब पाहता, विरोधकांनी आता एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.