Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड नेमकं काय करण्याच्या तयारीत?; 'त्या' मेसेजमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:06 PM2021-02-22T13:06:39+5:302021-02-22T13:10:31+5:30

पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. राठोड नेमके कुठे आहेत याची माहिती कोणाकडेही नाही. मात्र आता राठोड लवकरच सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते संजय राठोड बेपत्ता झाल्यानं विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. राठोड निर्दोष असतील तर ते समोर का येत नाहीत, असे प्रश्न विरोधकांना उपस्थित केले.

पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या पोलीस जबाबात राठोड यांच्या नावाचा उल्लेख नाही. पूजाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबद्दल कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही. मात्र तरीही राठोड बेपत्ता असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेले राठोड उद्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी येण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी राठोड समर्थकांकडून सुरू केली आहे.

बंजारा समाज राठोड यांच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्यासाठी राठोड समर्थकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. उद्या पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन करण्याचा राठोड यांच्या कार्यकर्त्यांचा मानस आहे.

व्हॉट्स ऍप, सोशल मीडियावर राठोड समर्थकांकडून उद्या सकाळी ११ वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अनेक व्हॉट्स ऍप ग्रुपवर याबद्दलचे मेसेज व्हायरल झाले आहेत.

राठोड यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. अन्यथा समाजाचं नुकसान होईल, अशा आशयाचे मेसेज सध्या बंजारा समाजाच्या विविध ग्रुप्सवर व्हायरल करण्यात आले आहेत. संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा, असं आवाहन मेसेजमधून करण्यात आलं आहे.

एका व्यक्तीनं किमान १० जणांना सोबत घेऊन राठोड यांच्या स्वागताला उपस्थित रहावं, असा उल्लेख मेसेजमध्ये आहे. त्यामुळे उद्या पोहरादेवीत राठोड शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गर्दी टाळण्याचं आवाहन जनतेला केलं. पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच राहिल्यास लॉकडाऊन करावा लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनाची तयारी करत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांचे पुढील काही दिवसातले दौरे रद्द केले असताना दुसरीकडे राठोड समर्थक मात्र स्वागताची तयारी करत आहेत.