“दरवाजा तोड अन् मोबाईल ताब्यात घे”; ‘ती’च्या आत्महत्येनंतर कथित मंत्र्याचा कार्यकर्त्याला आदेश

By प्रविण मरगळे | Published: February 13, 2021 09:08 AM2021-02-13T09:08:53+5:302021-02-13T10:01:38+5:30

Pooja Chavan Suicide Case, Audio Clip viral in Social Media over allegation on Thackeray Government Cabinet Minister of Vidarbha: परळीतील पूजा चव्हाणने पुण्यातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, या आत्महत्येनंतर या प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे, भाजपाने ठाकरे सरकारमधील मंत्र्यामुळे तरूणीने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील गोत्यात आला आहे, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याबाबतीत एका तरुणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता, त्यानंतर परळीच्या तरूणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, मात्र या प्रकरणाला वेगळं लागलं आहे, यातील विविध ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्या आहेत.

एक कार्यकर्ता कथित मंत्र्याला फोन करून सांगतोय, ते आत्महत्येचे वेड तिच्या डोक्यातून काढून टाका, आत्महत्या पर्याय नाही, कितीतरी पोरींचे ती आयडॉल आहे, ती आत्महत्या करतेय म्हणजे अवघड आहे, तुम्ही तिला समजवा, त्यावर मंत्री म्हणतात तिला एवढं स्पष्ट बोलूनही तिच्या डोक्यात तोच विषय आहे, त्यावर कार्यकर्त्यांनी तिला ट्रिटमेंट करूया असं म्हटलं होतं, तर ती ट्रिटमेंट करायला तयार आहे पण त्यानंतर आत्महत्या करेन असं ती तरूणी सांगत असल्याचं कार्यकर्त्याने मंत्र्याला सांगितले.

तुम्ही सांगा, तिच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार काढा असं कार्यकर्ता मंत्र्याला विनंती करत आहे, तिने विचारलं तु का सांगितले, त्यावर कार्यकर्त्याने सांगितले गरजेचे आहे, आत्महत्या पर्याय नाही हे तिच्या डोक्यातून काढा हे वारंवार कार्यकर्ता कथित मंत्र्याला सांगत असल्याचं ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,

त्याचसोबत या मुलीच्या आत्महत्येनंतर कार्यकर्ता आणि कथित मंत्री यांच्यात पुन्हा संवाद झाला, ही ऑडिओ क्लीप बंजारा भाषेत आहे, आत्महत्येनंतर अरूण नावाचा कार्यकर्ता तिथेच उपस्थित होता, मंत्री त्या अरूणला दरवाजा तोड आणि तिचा मोबाईल काढून घ्या असं सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. फोन त्यांच्याहाती लागू देऊ नको, त्यावर कार्यकर्ता मी पुन्हा फोन करतो फोन सुरूच ठेवा असं कथित मंत्र्याला सांगत आहे.

ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या २२ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे, या संदर्भात भाजपाच्या महिला आघाडीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, त्याचसोबत सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या क्लीपमधील आवाज तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजाने पुण्यात आत्महत्या केली, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, या तरूणीने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र तिला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले यावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

पूजा चव्हाण ही परळीत राहणारी तरूणी आहे, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, तिला शासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तिच्या कुटुंबाने केली आहे.

त्याचसोबत पूजाच्या आत्महत्या प्रकरणी भाजपाही आक्रमक झाली आहे, भाजपाच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट त्या मंत्र्याचं नाव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न केला आहे, संजय राठोड यांच्या मुसक्या कधी आवळणार असा सवाल करत चित्रा वाघ यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना या प्रकरणी पत्र पाठवलं आहे, पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणातील १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलच मोठा पुरावा आहे. १२ संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत.ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सूचना कथित मंत्र्याकडून कुण्या अरूणला होताना सगळ्यांनी ऐकल्या‬,अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

एकूणच पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.