आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना चेंबरमध्ये कोंडले, पोलिसांनी आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:41 PM2021-03-23T22:41:11+5:302021-03-23T22:51:52+5:30

MLAs locked the Speaker in the chamber : रस्त्यापासून सभागृहापर्यंत आंदोलनाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण आज बिहार विधानसभेमध्ये जे काही घडले तसे याआधी कधीही घडले नसेल.

रस्त्यापासून सभागृहापर्यंत आंदोलनाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण आज बिहार विधानसभेमध्ये जे काही घडले तसे याआधी कधीही घडले नसेल. आज बिहार विधानसभेमध्ये आरजेडीच्या आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर हे आमदार आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.

आरजेडीच्या आमदारांनी बिहार विधानसभेच्या अध्यक्षांच्या चेंबरसमोर गोंधळ घातला. त्यामुळे या आमदारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बलप्रयोग करावा लागला.

विधानसभेला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आरजेडीच्या आमदारांनी सभागृहामध्येही खूप गोंधळ घालता. यादरम्यान, या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या चेंबरमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

यादरम्यान, पोलीस आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यांनंतर पोलिसांनी आमदारांना धक्काबुक्कीही केली. हा गोंधळ राज्य सरकारने मांडलेल्या बिहार पोलीस सशस्त्र विधेयकाविरोधात झाला. तेजस्वी यादव यांनी हा काळा कायदा असल्याचे म्हटले आहे.

बिहारमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने मंगळवारी बिहार विधानसभेला घेराव घालण्याचे आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनावरून आज पाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले. यादरम्यान, परवानगीशिवाय आंदोलन करणारे राजद नेते तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

बिहारमध्ये कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि वाढत्या महागाईसह विविध मुद्द्यांवरून राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने विधानसभेला घेराव घालण्याची घोषणा केली होती, त्याला प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.