Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेची मुसंडी वाढवणार काँग्रेस, राष्ट्रवादीची डोकेदुखी? काय सांगतो ग्रामपंचायतीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 10:29 PM2021-01-18T22:29:23+5:302021-01-18T22:34:51+5:30

Maharashtra Gram Panchayat Election Results: ग्रामीण भागांत शिवसेनेची कामगिरी उंचावली; काँग्रेस, राष्टवादीची चिंता वाढली

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं बिनसलं. शिवसेनेनं भाजपची साथ सोडत थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं.

सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावाची निवड झाली. या सरकारमध्ये बरीचशी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र उद्धव ठाकरेच सरकारचा चेहरा आहेत.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेताच काही महिन्यांतच कोरोनाचं संकट आलं. त्यानंतर अतिवृष्टी, महापूर अशी संकटंदेखील आली. या काळात मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला.

शहरी पक्ष अशी शिवसेनेची ओळख. मात्र आजचा निकाल पाहिल्यास शिवसेनेनं राज्याच्या ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीची ग्रामपंचायत निवडणुकीतील कामगिरी चांगली झाली आहे. मात्र शिवसेनेचं वाढतं वर्चस्व दोन्ही काँग्रेसची काळजी वाढवणारं आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक शिवसेनेनं महाविकासआघाडी म्हणून लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेनं अमरावती शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिला होता. मात्र या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी शिवसैनिकांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ताकदीनं कामाला लागण्याचे आदेश दिले. या निवडणुकीत २ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला शिवसेनेची चांगली साथ लाभली आहे. मात्र शिवसेनेचं वाढतं प्राबल्य मित्रपक्षांच्या चिंतेत भर घालणारं आहे.

पश्चिम महाराष्ट्रानं कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिली आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रातही चांगली कामगिरी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असल्याचा फायदा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी करुन घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. मात्र तरीही शिवसेना आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पॅनलनं विजय मिळवत पाटलांना जोरदार धक्का दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटामध्येच प्रमुख लढत झाली. कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटाला संमिश्र यश मिळालं. भाकरवाडी येथील सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील ५ ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं झेंडा रोवला.

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांनी धडक दिली आहे. पालोद ग्रामपंचायतवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.