कंगना राणौतचा पुढचा 'निशाणा' ठरला; मुंबईत येताच गियर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 07:18 PM2020-09-09T19:18:44+5:302020-09-09T19:22:50+5:30

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर हल्लाबोल करणारी कंगना राणौत आज मुंबईत दाखल झाली. शिवसेना आणि कंगना यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असल्याचं तिच्या आजच्या ट्विट्समधून स्पष्ट झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राऊत यांनी कंगनावर घणाघाती टीका केली.

संजय राऊत यांच्या टीकेला कंगनानंदेखील प्रत्युत्तर दिलं. मुंबईवर, मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर इथे राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला सुनावलं.

९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवा, असं थेट आव्हान कंगनानं राऊत आणि शिवसेनेला दिलं. कंगनानं तिचे शब्द खरेही करून दाखवले. आता मुंबईत येताच कंगनानं गियर बदलला आहे.

मुंबईतील घरात पोहोचताच कंगनानं आपला पुढील निशाणा कोण असणार, हे स्पष्ट केलं आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. कंगनानं ठाकरेंचा थेट एकेरी उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनानं आव्हान देणारी भाषा केली आहे. 'उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उद्धवस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा हा अहंकार मोडून पडेल,' अशा शब्दांमध्ये कंगनानं मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.

माझं कार्यालय पाडून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. वेळ ही नेहमी एकसारखी नसते, असं म्हणत कंगनानं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आज सकाळी कंगनानं अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर, ठाकरे सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावेळी तिनं घर पाडायला आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची तुलना बाबराच्या फौजेशी केली होती. पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यानं तिचा निशाणा थेट शिवसेना पक्षप्रमुखांवरच होता, असं बोललं जात आहे.

'मणिकर्णिका फिल्मच्या कार्यालयात पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

सकाळी कंगनानं उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नव्हतं. त्यावेळी ती हिमाचल प्रदेशहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाली होती. मुंबईत येताच कंगनानं अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. तिनं थेट ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनाच शिंगावर घेतलं आहे.