Bihar: बिहारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला अखेर ठरला; मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना तर भाजपाला....

By प्रविण मरगळे | Published: November 16, 2020 02:56 PM2020-11-16T14:56:56+5:302020-11-16T15:00:41+5:30

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारची आज स्थापना होत आहे. नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र, यावेळेस आलेल्या निकालामुळे जेडीयू कोट्यातून मंत्र्यांची संख्या कमी असेल तर भाजपच्या कोट्यात मंत्र्यांची संख्या जास्त असेल.

एनडीएमध्ये भाजपा-जेडीयू-हम(HAM)-व्हीआयपी(VIP) या चार पक्षांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत एनडीएमधील मित्रपक्षांमध्ये मंत्रिपदासंबंधीचे सूत्र ठरविण्यात आलं आहे, साडेतीन आमदारांवर एक मंत्री बनेल, या फॉर्म्युलानुसार चारही पक्षांना प्रतिनिधित्व मिळेल. पण नितीश यांच्या अनेक जुन्या मंत्र्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही.

बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेत घटनात्मक तरतुदीनुसार १५ टक्के सदस्यांना मंत्री केले जाऊ शकतं. त्याप्रमाणे बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह केवळ ३६ जणांचे मंत्रिमंडळ असेल. यावेळी बिहार निवडणुकीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या असून त्यापैकी भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जेडीयूला ४३ जागा, हिंदुस्तान आम मोर्चाला ४ जागा आणि विकास इंसाफ पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या संख्येनुसार मंत्रीपद मिळेल.

एनडीएमध्ये साडेतीन आमदारांवर एक मंत्रिपद या फॉर्म्युल्यानुसार २१ मंत्रिपदे भाजपाच्या वाट्याला मिळतील. त्याचबरोबर जेडीयूच्या आमदारांच्या संख्येनुसार जास्तीत जास्त १२ मंत्र्यांची नेमणूक करता येईल. या व्यतिरिक्त जीतनराम मांझी यांच्या पक्षाला एक आणि मुकेश साहनी यांच्या कोट्यात एक मंत्रीपद मिळणार आहे.

तथापि, स्वत: नितीशकुमार मुख्यमंत्री राहिले आहेत, तर जेडीयू कोट्यात ११ मंत्री पदे असतील, बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयूतून १४ मंत्री लढले होते, त्यापैकी ८ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर ६ मंत्री विजयी होऊ शकले.

बिजेंद्र यादव, श्रावणकुमार, बीमा भारती, नरेंद्र नारायण यादव, महेश्वर हजारी आणि नितीश सरकारमधील मंत्री असलेले मदन सहनी यांनी विधानसभा जिंकली. या व्यतिरिक्त विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांना आपली जागा जिंकता आली आहे, परंतु यावेळी ते सभापती बनण्याऐवजी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

एनडीए सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून एकूण ११ मंत्री केले जाऊ शकतात, त्यात नितीशकुमारांसमोर प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखणं आव्हानात्मक असणार आहे. या दृष्टीने जुन्या मंत्र्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर, भाजपाला आपले राजकीय समीकरण तयार करण्यासाठी पुरेसे पर्याय आहेत. भाजपाला दोन उपमुख्यमंत्र्यासह विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरही पक्षाच्या नेत्याला संधी देणं सोप्प असणार आहे.

त्याचवेळी एनडीएचे सहकारी असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे चार आमदार विजयी झाले आहेत. स्वत: हमचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी मंत्री होण्यास नकार दिला आहे, त्यामुळे त्यांचा मुलगा संतोष मांझी यांना मंत्रीपद देण्यात येईल.

संतोष मांझी सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्याचवेळी विकास इन्साफ पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी स्वत: निवडणूक हरले आहेत, परंतु त्यांचे चार आमदार विजयी झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या कोट्यातही एक मंत्री पद येत आहे ज्यावर ते स्वत: मंत्री होण्याची शक्यता आहे.

एनडीएच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजपाने ११ विधानसभा जागा आणि एक एमएलसी जागेचे व्हीआयपींना(VIP) आश्वासन दिले होते. अशा परिस्थितीत मुकेश सहनी स्वतः विधानपरिषदेचे सदस्य होतील आणि नितीश सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे. याशिवाय एकमेव अपक्ष आमदार सुमित सिंग यांनीही एनडीएला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु सध्या त्यांना मंत्रिपद मिळणं अवघड आहे.