मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण

By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 03:37 PM2021-01-14T15:37:13+5:302021-01-14T15:47:43+5:30

राज्यात सध्या सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राजकीय वातावरण पेटलं आहे. बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने लैंगिक शोषण केलं असा आरोप महिलेने केला आहे. तर आरोप खोटा असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

या प्रकरणाचा खुलासा करताना धनंजय मुंडे यांनी माझे एका महिलेसोबत परस्पर संबंध होते, त्यातून आम्हाला २ मुलं झाली, त्या मुलांना माझे नाव दिले आहे, त्यांचा सांभाळ मी करतोय, मात्र त्या महिलेच्या बहिणीने पैशासाठी माझ्यावर खोटे आणि बदनामी करणारे आरोप केले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या २ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर इतके गंभीर आरोप होत असताना राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने यावर सावध भूमिका घेणे पसंत केलं होतं, भाजपाचे किरीट सोमय्या आणि महिला आघाडी वगळता इतर बड्या नेत्यांनी यावर २४ तास भाष्य केलं नाही, परंतु त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर निवेदन देत धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका घेतली होती

धनंजय मुंडे प्रकरणात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राजीनाम्याची मागणी केली असताना दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संयमाची भूमिका घेतलेली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी सांगितले.

तसेच, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर मला अधिक काही बोलायचे नाही. नवाब मलिक यांनी भूमिका मांडली, तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे असं सांगत अधिक भाष्य करणं टाळलं. तर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप कौटुंबिक आहेत, ते यावर योग्य बोलतील असं नवाब मलिक म्हणाले होते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात खुद्द राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, त्यांनी माझी भेट घेऊन माहिती दिली आहे. ही माहिती पक्षाच्या इतर सहकाऱ्यांसोबत शेअर करून बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगत एकप्रकारे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत का? अशीही एक चर्चा सुरू आहे. राज्यातील सत्तांसंघर्षाच्या काळात शरद पवारांना न कळता अजित पवारांनी थेट भाजपासोबत हातमिळवणी केली होती, त्यावेळी अजितदादांसोबत एक नाव प्रखरतेने समोर आलं ते म्हणजे धनंजय मुंडे...शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी उशीरा लावलेली हजेरी खूप काही सांगणारी होती. त्यामुळे आत्ताच्या या घटनेला तेव्हाच्या घटनेसोबत जोडून पाहिलं जात आहे.

धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता, गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत पुतण्या धनंजय मुंडे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं होतं, त्यानंतर आमदार, विरोधी पक्षनेते, मंत्रिपद अशी विविध जबाबदारी राष्ट्रवादीने त्यांना सोपावली. त्यातच मध्यंतरीच्या काळात अजितदादांसोबत धनंजय मुंडेही भाजपासोबत गेल्याचं बोललं जात होतं.

या संपूर्ण प्रकरणात भाजपाने घेतलेली भूमिकाही राजकीय दृष्ट्या संशयास्पद आहे. कारण महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणताना वेळोवेळी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र धनंजय मुंडे प्रकरणात बलात्कारासारखा गंभीर आरोप होत असतानाही भाजपाने कुठेही आक्रमकता दाखवल्याचं दिसत नाही. किंबुहना भाजपा नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलं.