नवरा नाही कसाई, श्वास थांबेपर्यंत मारायचा... प्रो कबड्डीतून प्रसिद्धी मिळवलेल्या दीपक हुडावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:13 IST2025-02-26T19:00:40+5:302025-02-26T19:13:53+5:30

हरियाणामध्ये वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने कबड्डीपट पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतरही हुंड्यासाठी पतीने मारहाण केल्याचा आरोप वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने केला आहे.

हरियाणाच्या हिसार येथील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा हिने तिचा पती आणि भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुडा विरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

स्वीटी बुरा हिने हिसारमध्ये दीपक हुडाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. स्वीटीने तिचा पती दीपकवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. लग्नात एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर कार देऊनही हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही स्वीटीने केला.

पोलिसांनी दीपक हुडाला नोटीस बजावून तपासात सहभागी होण्यास सांगितले होते, मात्र तो हजर झाला नाही. स्वीटीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दीपक हुडाचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. याशिवाय स्वीटीने घटस्फोटासाठी कोर्टात ५० लाख रुपये भरपाई आणि दीड लाख रुपये मासिक देखभाल भत्ता देण्याची मागणी केली आहे.

दीपक हुडानेही रोहतकमध्ये स्वीटी आणि तिच्या कुटुंबियांवर मालमत्ता हडप केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. स्वीटी आणि दीपक हे दोघेही भाजपचे नेते आहेत.

कधी वाटेल तेव्हा मारहाण करायचा, श्वास थांबेपर्यंत मारहाण करायचा, अनेक दिवस घरात कोंडून ठेवायचा, हुंड्यात आणखी एक कोटी आणि फॉर्च्युनर हवीय असा सांगायचा. ज्याच्यासाठी सर्वस्व सोडले तो कसाई निघाला, असे गंभीर आरोप स्वीटीने केले आहेत.

७ जुलै २०२२ रोजी स्वीटी आणि दीपकचे लग्न झालं होतं. दोघांचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते, जे लग्नानंतर संपले. दीपक जेव्हा गरिबीत होता तेव्हा त्याच्याकडे घरही नव्हते. त्यामुळे स्वीटीने त्याला पाठिंबा दिला. तो एका मातीच्या घरात राहत होता.

दीपक हुडा भारताकडून खेळला आहे. कबड्डीच्या जगातील मोठ्या नावांमध्ये त्यांचा समावेश होतो. तो भारताच्या विश्वविजेत्या संघाचाही एक भाग होता.