US Open Record : सानिया मिर्झासह अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवणारे भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 21:42 IST2025-09-04T21:38:10+5:302025-09-04T21:42:12+5:30
ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीत आतापर्यंत एकाही भारतीयाला छाप सोडता आलेली नाही, पण....

भारताचा टेनिसपटू युकी भांबरी याने ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करताना यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत सेमी फायनल गाठली आहे. पुरुष दुहेरीत न्यूझीलंडच्या न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससोबत खेळाताना त्याने ही कमाल करून दाखवलीये. या स्पर्धेत जेतेपद मिळवून इतिहास रचण्याची संधी या भारतीय टेनिस स्टारकडे आहे.
ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या एकेरीत भारतीय टेनिसपटूंचा जलवा दिसला नसला तरी मिश्र दुहेरीत याआधीही भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली आहे. यात सानिया मिर्झा ही एकमेवर महिला टेनिसपटू आहे.
टेनिसच्या कोर्टवरील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक जेतेपद पटकवण्याचा विक्रम हा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याच्या नावे आहे.
लिएंडर पेस याने आपल्या कारकिर्दीत पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत एकूण १८ वेगवेगळ्या ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. यात पाच वेळा त्याने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
२००६ मध्ये मार्टिन डॅम ज्युनिअरच्या साथीनं त्याने पुरुष दुहेरीत जेतेपद पटकावले होते. २००८ मध्ये मिश्र दुहेरीत झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीनं तर २००९ मध्ये लुकस ड्लोही आणि २०१३ मध्ये रादेक स्टेपानेकच्या साथीनं पुरुष दुहेरीत त्याने बाजी मारली होती. याशिवाय २०१५ मध्ये मार्टिना हिंगीसच्या साथीनं त्याने मिश्र दुहेरीत अमेरिकन ओपन स्पर्धा गाजवली होती.
महेश भुपतीने तीन वेळा अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत छाप सोडलीये. १९९९ मध्ये जपानच्या ऐ सुगियामाच्या साथीनं मिश्र दुहेरीत त्याने पहिल्यांदा ही स्पर्धा गाजवली. २००२ मध्ये मॅक्स मिर्न्यीच्या साथीनं पुरुष दुहेरी तर २००५ मध्ये दानियेला हंटुचोवाच्या साथीनं मिश्र दुहेरीत महेश भुपतीने अमेरिकन ओपन स्पर्धेत जेतेपद जिंकले होते.
२०१४ मध्ये सानिया मिर्झानं ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसच्या साथीनं अमेरिकन स्पर्धेतील मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले होते.
२०१५ मध्ये सानिया मिर्झानं मार्टिन हिंगीसच्या साथीनं महिला दुहेरीत अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमचा किताब जिंकला होता.