भारताचा खरा (गोल)'रक्षक'! श्रीजेश मोक्याच्या क्षणी धावून आला; कारकिर्दीचा शेवट गोड झाला! By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 07:50 PM 2024-08-08T19:50:15+5:30 2024-08-08T20:31:02+5:30
india vs spain bronze medal match : भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. भारताने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनचा २-१ असा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश मोक्याच्या क्षणी धावून आल्याने भारताची आघाडी कायम राहिली.
श्रीजेशने स्पेनविरूद्ध त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळला. सामन्याच्या अखेरीस भारत २-१ अशा आघाडीवर कायम होता. पण, स्पेनला सलग दोनदा पेनल्टी कॉर्नर मिळाले अन् भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली.
मात्र, भारताचा गोलरक्षक श्रीजेश स्पेनच्या संघासाठी काळ बनून पुढे आला. त्याने अप्रतिम कामगिरी करताना गोल वाचवला अन् भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.
भारताने सामना जिंकताच सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला. खांद्यावर वाहून नेत गोलरक्षक श्रीजेशच्या कारकीर्दीचा समारोप सुखद केला. तसेच मनप्रीत सिंगने हा विजय श्रीजेशला समर्पित केला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. त्याने ८ सामन्यांत १० गोल करून मोर्चा सांभाळला.
भारताने कांस्य पदक जिंकले त्यात पीआर श्रीजेशचा सिंहाचा वाटा आहे. सामन्याच्या अखेरीस स्पेनने आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या इराद्याने पावलं टाकली. पण, श्रीजेश स्पेनसमोर एखाद्या भिंतीसारखा भक्कमपणे उभा राहिला.
कांस्य पदकाच्या लढतीत पहिला गोल करून आघाडी घेऊनही स्पेनला विजय साकारता आला नाही. सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत स्पेनचे खेळाडू गोल करण्यासाठी तरसले.
भारताने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली आणि २-१ ने सामना आपल्या नावावर केला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले.
'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' म्हणून ख्याती असलेल्या श्रीजेशने ऑलिम्पिकमधील प्रत्येक सामन्यात त्याचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचा मारा सहजपणे झेलणारा श्रीजेश स्पेनविरूद्धच्या विजयासह निवृत्त झाला.
खरे तर भारत सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवेल अशी तमाम भारतीयांना आशा होती. पण, जर्मनीने तमाम भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करत अंतिम फेरी गाठली अन् भारताला पुन्हा एकदा कांस्य पदकासाठी लढावे लागले.
भारताच्या हॉकी संघाला जर्मनीने उपांत्य फेरीत पराभूत करून सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले. तर स्पेनला नेदरलँड्सकडून उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गुरूवारी भारत विरूद्ध स्पेन असा कांस्य पदकासाठी सामना झाला.
भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर यंदाची स्पर्धा गाजवली. पण, उपांत्य फेरीत काही चुकांमुळे त्यांना सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले.