CWG 2022:भारतासाठी सोनेरी कामगिरी करणारे खेळाडू; राष्ट्रकुल स्पर्धेत 'या' शिलेदारांनी जिंकले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:36 AM2022-08-04T10:36:25+5:302022-08-04T10:57:35+5:30

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये आतापर्यंत एकूण १८ पदक जिंकली आहेत. त्यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये मीराबाई चानूने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात विक्रमी भार उचलून तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. चानूने २०१ किलो (८८+११३) एवढे वजन उचलून विजयावर शिक्कामोर्तब केला. विशेष म्हणजे तिची ही उचल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलल्यानंतर तिने मोठी आघाडी घेतली आणि दुसऱ्या प्रयत्नात ८८ किलो वजन उचलून इतिहास रचला.

भारताला जेरेमी लालरिनुंगाच्या रूपात दुसरे सुवर्ण मिळाले. १९ वर्षीय युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. अवघ्या १९ व्या वर्षी त्याने सुवर्ण भार उचलून इतिहास रचला आहे. पुरूषांच्या ६७ किलो वजनी गटात त्याने ही सुवर्ण किमया साधली. जेरेमी लालरिनुंगाने ३०० (१४०+१६० किलो) वजन उचलून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. जेरेमीने ४ वर्षांमध्ये तिसऱ्यांदा तिरंग्याची शान वाढवली असून २०१८ मध्ये देखील तो युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता. त्यामुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून देखील त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.

अतिशय गरीब परिस्थितीतून राष्ट्रकुल स्पर्धेच्या व्यासपीठावर पोहचून अचिंता शेऊलीने ऐतिहासिक कामगिरी केली. सायकल रिक्षा चालवून आपले कुटुंब चालवणाऱ्या वडीलांच्या मुलाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण भार उचलून एतिहास रचला आहे. पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अचिंता शेऊली याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. २०२१ च्या जुनिअर जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ७३ किलो वजनी गटात रौप्यपदक आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सुवर्ण पदकांची त्याच्या नावावर नोंद आहे. अचिंताचे वडील सायकल रिक्षा चालवून कुटुंब सांभाळायचे, परंतु अचिंता इयत्ता ८वीत असताना त्याच्या वडीलांनी जगाचा निरोप घेतला. अचिंताने जीवनाशी संघर्ष करत सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली.

लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रूपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवला. विशेष म्हणजे भारतीयांच्या परिचयाचा नसलेल्या लॉन बॉल क्रीडा प्रकारात भारतीय महिलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा मोठा विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे लॉन बॉलच्या इतिहासात भारताने पहिलेच पदक पटकावले आहे. आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी सॉलिड खेळ केला. उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना सुवर्णपदकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला होता.

भारताच्या पुरुष संघाने जेतेपद कायम राखताना सिंगापूरवर ३-१ असा विजय मिळवला आणि सुवर्ण पदकावर नाव कोरले. बल टेनिसमध्ये पुरूष सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्याच दुहेरीच्या लढतीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या हरमीत देसाई व साथियन ज्ञानसेकरन या जोडीने अटीतटीच्या सामन्यात सिंगापूरच्या याँग इझाक व येव एन कोएन पँग यांचा १३-११, ११-७, ११-५ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत बदल पाहायला मिळाले मात्र एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात हरमीत देसाईने ११-८, ११-५ अशी आघाडी घेताना सिंगापूरच्या झे यू क्लेरेन्सचा बॅकफूटवर फेकले. त्यामुळे तिसरा गेम चुरशीचा रंगताना दिसला. हरमितने तिसरा गेम ११-६ असा जिंकून भारताच्या सुवर्णपदकावर नाव पक्के केले.