राज ठाकरेंच्या वाढदिनी संकल्प, 53 हजार घरांत भेट देणार पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:07 PM2021-06-12T21:07:35+5:302021-06-12T21:25:18+5:30

राज ठाकरेंच्या या आवाहनाला नवी मुंबईतील मनसेचे नेते गजानन काळे यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. कारण, राज यांच्या वाढदिवसानिमित्त काळे तब्बल 53 हजार पुस्तके वाटणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे.

राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात.

परंतु मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंच्या या आवाहनाला नवी मुंबईतील मनसेचे नेते गजानन काळे यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. कारण, राज यांच्या वाढदिवसानिमित्त काळे तब्बल 53 हजार पुस्तके वाटणार आहेत.

माणसांचे हात सुटत जाताना, पुस्तकांचे हात धरावे.! मनावरल्या लाख ओझ्याचे, थोडे हलके गीत करावे.!, असे म्हणत राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५३ हजार घरी पुस्तक भेट देण्याचा संकल्प काळे यांनी जाहीर केला आहे.

“पुस्तक घरोघरी अभियान” आम्ही तुमच्या आवडीच्या पुस्तकांना माणुस म्हणुन तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत, असे म्हणत काळे यांनी हा उपक्रम आखला आहे.

या उपक्रमांतर्गत राज्यातील तब्बल 53 हजार घरांमध्ये म्हणजे एक कुटुंब, एक पुस्तक अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी, वर्षभर नोंदणी सुरू राहणार आहे.

विशेषत: नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात आलं असून तब्बल 53 हजार घरांमध्ये पुस्तकांचे वाटप होत असून आपणास कोणते पुस्तक हवे आहे, ते नोंदणी करुन सांगायचे आहे.

काळे यांनी बहुतांश पुस्तकांची यादीच या आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केली आहे. त्यामध्ये, छत्रपती संभाजी राजेंपासून ते नरेंद्र दाभोळकरांच्या विचार तर कराल, या पुस्तकांचा समावेश आहे.

राज ठाकरेंचा 53 वा वाढदिवस असल्याने 53 हजार पुस्तके वाटण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यात येत आहे.

वाचन चळवळ वृद्धीगत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून आपणास जे पुस्तक हवे त्याची नोंदणी करण्याचे आवाहन नवी मुंबई मनसेकडून करण्यात आलं आहे.

या पुस्तकासोबत एक पोस्टकार्ड मिळणार आहे, त्यावर आपणस या पुस्तक घरोघरी अभियानाबाबत व पुस्तकाबाबत मत लिहायचे आहे.