कोरोना संकटात झिकाचा धोका! लष्करी अधिकाऱ्याला लागण; जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 04:23 PM2021-10-25T16:23:39+5:302021-10-25T16:29:34+5:30

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र तिसरी लाट टाळण्यासाठी लसीकरण मोहीम वेगानं राबवण्याची गरज आहे.

कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (AY.4.2) आढळून आला आहे. महाराष्ट्रातील एक टक्का नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे.

कोरोनाचं संकट कायम असताना आणखी एका जीवघेण्या विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळनंतर उत्तर प्रदेशात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच झिकाचा रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण सापडला आहे. भारतीय हवाई दैलात तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याला झिकाची लागण झाली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्याला झिकाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.

गेल्या काही दिवसांपासून हवाई दलाच्या अधिकाऱ्याला ताप येत होता. याशिवाय काही रहस्यमय लक्षणं दिसून येत होती, अशी माहिती कानपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नेपाल सिंह यांनी दिली. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यात पाठवण्यात आले. तेथील प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीनंतर अधिकाऱ्याला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

झिका विषाणूचा फैलाव एडिस डासांमुळे होतो. या प्रजातीचा डास दिवसा चावतो. झिकाची लक्षणं डेंग्यूसारखीच असतात. प्रामुख्यानं ती सौम्य स्वरुपाची असतात.

ताप, डोळे येणं, मांसपेशी आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी ही झिकाची लक्षणं आहेत. साधारणत: २ ते ७ दिवस ही लक्षणं दिसून येतात. झिका विषाणूची लागण झालेल्या बऱ्याचशा व्यक्तींमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना झिकामुळे सर्वाधिक धोका असतो.

झिका विषाणू डासांमुळे पसरतो. १९४७ मध्ये सर्वप्रथम माकडांमध्ये हा विषाणू आढळला. १९५२ मध्ये युगांडा आणि टास्मानियातील माणसांमध्ये तो आढळून आला. आफ्रिका, अमेरिका, आशिया, पॅसिफिकमध्ये झिकाचे फैलाव पाहायला मिळाला आहे.

झिका विषाणूवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. यासाठीचं संशोधन सुरू आहे. भरपूर आराम, तरल पदार्थ प्यायल्यानं आणि सामान्य औषधं घेतल्यानं झिकावर मात करता येते.

Read in English