देणगी न देणाऱ्यांची नावं लिहिली, राम मंदिर वर्गणीवरुन उफाळला राजकीय वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 09:00 PM2021-02-16T21:00:36+5:302021-02-16T21:11:22+5:30

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशव्यापी देणग्या गोळा करण्याची मोहीम जानेवारीमध्ये सुरू करण्यात आली. मात्र, या देणग्यांवरून आता राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी राम मंदिराच्या देणगीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत देणग्या न देणाऱ्यांची नावे गोळा करत असल्याचा दावा केला आहे.

'राम मंदिर निधी समर्पण अभियान'चे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचे काम करत आहे. मात्र, जे स्थानिक पैसे देत नाहीत, त्यांची नावे लिहून घेत आहेत. ते असे का करत आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला.

जर्मनीमध्ये ज्यावेळी नाझी पक्ष उदयास आला. त्याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. राम मंदिरासाठी देणग्या देणारे आणि न देणारे यांच्या घरावर वेगवेगळ्या खुणा केल्या जात आहेत, असा दावा करत RSS कडून नाझींची धोरणे राबवली गेली, तर या देशाचे काय होईल, अशी विचारणा कुमारस्वामी यांनी केली आहे.

सद्य परिस्थितीत देशात अघोषित आणीबाणी असल्याची स्थिती आहे. देशवासी मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करू शकत नाहीत. आगामी कालावधीत मीडियावरही निर्बंध लादले जाऊ शकतात, असा दावा कुमारस्वामी यांनी केला.

दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कारण त्यासाठी ते लायक नाहीत, असा पलटवार RSS चे मीडिया प्रभारी ई.एस प्रदीप यांनी केला आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कोटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संघचालकावर राम मंदिरासाठी देणगी गोळा करतो म्हणून गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली होती.

मी कधीच असा विचार केला नाही की, कुमारस्वामी एवढ्या खालच्या स्तराला जाऊन विधान करतील. राम मंदिरासाठी लोकं स्वयंस्फूर्तीने देणगी देत आहेत. कोणाची नावे लिहून घेतली हे त्यांनी सांगावं.

कुमारस्वामींचं विधान हे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेसाठी चांगलं नाही. त्यांचे हे विधान धादांत खोटं आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवि यांनी म्हटलंय.

राम मंदिर उभारणीसाठीच्या वर्गणीवरुन भाजपा आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यात राजकीय वाद उफाळल्याचे दिसून येते