धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 20:44 IST2025-05-09T19:55:18+5:302025-05-09T20:44:21+5:30
MS Dhoni Indian Army Sachin Tedulkar Air Force, India Pakistan Conflict: महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर हे 'टेरिटोरियल आर्मी'चा भाग आहेत.

MS Dhoni Indian Army Sachin Tedulkar Air Force, India Pakistan Conflict:
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान, PoK मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. तरीही पाकिस्तान सुधरत नाहीये.
८ मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर, भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये हल्ले करत प्रत्युत्तर दिले. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला.
एमएस धोनी आर्मीचा गणवेश घालणार का?
या सगळ्यात भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्करप्रमुखांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत आणि टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सैन्याला भारतीय सैन्याला मदत करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रादेशिक सेना ही भारताची एक निमलष्करी दल आहे जी नियमित सैन्याला मदत करते. प्रादेशिक सैन्याचे सदस्य नोकरी करू शकतात आणि स्वतःचे काम करू शकतात. यासोबतच, ती गरज पडल्यास देशाला मदत देखील करते.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील या सैन्याचा एक भाग आहे. महेंद्रसिंग धोनीला २०११ मध्ये भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली. तो 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनशी संलग्न आहे.
सैन्यासोबत धोनीने घेतले आहे प्रशिक्षण:
२०१५ मध्ये धोनीने पॅराट्रूपरचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि आग्रा येथे प्रशिक्षणादरम्यान त्याने भारतीय लष्कराच्या विमानातून ५ वेळा पॅराशूटने उडी मारली. यानंतर, २०१९ मध्येही त्याने २ आठवडे प्रशिक्षण घेतले.
धोनीचा लष्करी रँक 'मानद' स्वरूपाचा:
२०१९ मध्ये धोनीने काश्मीरमध्ये १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनसोबत वेळ घालवला. या काळात त्याने गस्त घालणे आणि अनेक लष्करी कारवाईत सहभाग घेतला. धोनीला दिलेला लष्करी दर्जा हा मानद आहे.
...तर युद्धभूमीवर जावे लागू शकते!-
"सचिन असो वा धोनी, त्यांना देशासाठी चांगले कार्य केल्याबद्दल सैन्यदलाचे मानद रँक देण्यात आले आहेत. ज्यांना मानद रँक दिला जातो, त्यांचा मुख्य उद्देश हा सशस्त्र दलांना प्रेरणा देणे आणि प्रतिमा मजबूत करणे हा असतो."
"जर भारत युद्धजन्य परिस्थितीत असेल आणि खरोखरच युद्ध सुरु झाले आणि रिझर्व्ह फोर्सेसची गरज भासली तर टेरिटोरियल आर्मीला युद्धभूमीवर रिपोर्ट करायला लागू शकतो आणि त्यात या स्टार्सचाही समावेश आहे," असे निवृत्त लेफ्टनंट कर्नल (डॉ.) सतीश ढगे यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.