'ओडिशा का मोदी'... भाजपाच्या 'या' खासदाराची सोशल मीडियावर लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 02:51 PM2019-05-25T14:51:42+5:302019-05-25T15:31:01+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागल्याने सर्वत्र मोदींची चर्चा आहे. मात्र सोशल मीडियावर 'ओडिशा का मोदी' असं म्हणत भाजपाच्या एका खासदाराची चर्चा रंगली आहे.

प्रताप चंद्र सारंग असं या खासदाराचं नाव आहे. ओडिशातील बालासोर येथून सारंग विजयी झाले आहेत. तेथील जनता सारंग यांना 'ओडिशा का मोदी' असं म्हणून संबोधते. सध्या सोशल मीडियावर प्रताप चंद्र सारंग यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.

सुलगना डॅश नावाच्या एका ट्वीटर युजरने प्रताप चंद्र सारंग यांचे काही फोटो पोस्ट करून त्यांच्याबाबत माहिती दिली आहे. 24 मे रोजी सुलगनाने केलेल्या ट्वीटला 7700 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर 3600 लोकांनी ते रिट्वीट केलं आहे.

सुलगनाने आपल्या पोस्टमध्ये प्रताप चंद्र सारंग हे ओडिशाचे मोदी आहेत असं म्हटलं आहे. तसेच सारंग यांच्याकडे जास्त संपत्ती नाही. एका छोट्या घरात राहतात. गेल्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. तसेच सायकलने प्रवास करतात असं म्हटलं आहे.

प्रताप चंद्र सारंग हे ओडिशातील बालासोरमधून विजयी झाले आहेत. या विजयानंतर आता ते दिल्लीला जाण्याची तयारी करत आहेत. ट्वीटरवर सारंग यांचे अनेक फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. सारंग यांनी बीजेडीच्या रबिंद्र कुमार जेना यांना 12,956 मतांनी पराभूत केलं आहे.

सारंग यांनी बालासोरमध्ये चांगल्या रितीने काम केलं आहे. लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. सारंग नेहमीच लोकांसाठी काम करत असतात त्यामुळे ते ओडिशाचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा अनेक युजर्स व्यक्त करत आहेत.

प्रताप चंद्र सारंग यांचा जन्म हा नीलगिरीतील गोपीनाथपूर गावामध्ये झाला. त्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. गेल्या अनेक वर्षापासून ते समाजसेवा करत आहेत. बालासोर आणि मयूरभंजमधील आदिवासी भागात सारंग यांनी काही शाळा सुरू केल्या आहेत.

2004 मध्ये प्रताप चंद्र सारंग यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. सारंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच मोदी जेव्हा ओडिशात येतात तेव्हा ते सारंग यांना नक्की भेटतात.