Corona Vaccine: धक्कादायक! देशात Covishield च्या बनावट लसी सापडल्या; WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:25 PM2021-08-18T14:25:24+5:302021-08-18T14:31:40+5:30

Corona Vaccine: Covishield लसीचे बनावट डोस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द सिरम इन्स्टिट्युटने याला दुजोरा दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. भारतात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात असून, १८ वर्षांपासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जात आहे.

देशात आताच्या घडीला कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक व्ही आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका गंभीर गोष्टीकडे जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधले आहे.

भारत आणि युगांडामध्ये Covishield लसीचे बनावट डोस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द सिरम इन्स्टिट्युटने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लसीकरणामुळे कोरोनाची भय काहीसे कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोके वर काढू लागली आहे.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने मंगळवारी यासंदर्भातील इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतामध्ये Covishield लसीच्या २ एमएलच्या वायल्स सापडल्या आहेत. मात्र, वास्तवात सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत.

दुसरीकडे युगांडामध्ये १० ऑगस्टलाच एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोव्हिशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचे आवाहन या देशांना केले आहे.

जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून करोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे, असे WHO ने नमूद केले आहे.

बनावट लसींचा धोका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्रे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, तुम्ही जर अशा प्रकारची लस घेतली असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन WHO ने केले आहे.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सहा महिने उलटून गेल्यानंतर लस उत्पादक कंपन्यांकडून लसींच्या दरात वाढ करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन केल्यानंतर लसींच्या किमतीत घट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, याउलट झाले.

जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी लसींचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यात वाढ करण्यात आली.कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रम २०० आणि २०६ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता.

सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ करण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे २०५ आणि २१५ रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ कोव्हिशिल्ड लसीच्या १० डोस असलेल्या एक शीशी मागे सरकारला ५० रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

तर कोव्हॅक्सिन लसीच्या २० डोस असलेल्या एका शीशी मागे सरकारला १८० रुपये जास्त मोजावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. आता नवीन किमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. देशातही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून, देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.