आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:05 IST2025-05-07T11:59:27+5:302025-05-07T12:05:50+5:30

Lt Col Sophia Qureshi operation Sindoor: सोफिया या महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. महत्वाचे म्हणजे सोफिया यांचे पती देखील सैन्यात मेजर आहेत.

पहलगाम हल्ल्याचा भारताने १५ दिवसांनी बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये ९० दहशतवादी मारले गेले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले होते. याची माहिती थोड्याच वेळापूर्वी तिन्ही दलांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याबद्दल भाष्य केले.

यानंतर नेटकऱ्यांमध्ये सोफिया कुरेशी कोण असा सवाल करण्यात येत आहे. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या अधिकारी आहेत. २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. कर्नल कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत, त्यांचे शिक्षण बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी आहे.

भारतीय सैन्याच्या सिग्नल कॉर्प्समध्ये त्या अधिकारी आहेत. सोफिया या महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. महत्वाचे म्हणजे सोफिया यांचे पती देखील सैन्यात मेजर आहेत.

मेजर ताजुद्दीन कुरेशी हे लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत आहेत. या दोघांना नऊ वर्षांचा मुलगा आहे.

सोफिया कुरेशी यांची कौटुंबीक पार्श्वभूमी देखील लष्करी आहे. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनीही काही काळ सैन्यात सेवा बजावली आहे.

यामुळे सैन्यात जाण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. अखेर १९९९ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) द्वारे सैन्यात कमिशन मिळाले.त्यांनी आतापर्यंतच्या काळात देशातील विविध आव्हानात्मक भागांमध्ये काम केले आहे.

मार्च २०१६ मध्ये त्यांना आणखी एक मैलाचा दगड पार केला. बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी बनून त्यांनी इतिहास रचला. हा भारताने आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशातील लष्करी सराव होता.