'तुम्ही जिंकलात अन् मी हरलो...', धीरुभाई अंबानी जेव्हा नितीन गडकरींशी पैज हरले! वाचा संपूर्ण किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:03 PM2022-05-06T12:03:17+5:302022-05-06T12:29:05+5:30

नितीन गडकरी त्यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे महामार्गाचं काम असं होतं की, धीरूभाई अंबानींनी फोन करून 'गडकरी, तुम्ही जिंकलात आणि मी हरलो' असं म्हटलं होतं.

मुंबई-पुणे महामार्गाचं निर्माण होत असतानाची गोष्ट आहे. धीरूभाई अंबानी हयात होते आणि नितीन गडकरी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. हा महामार्ग त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत बांधला जाणार होता. या महामार्गाच्या बांधकामासाठी अनेक खासगी कंपन्याही कंत्राट घेण्यास इच्छुक होत्या, त्यात धीरूभाई अंबानी यांचाही समावेश होता.

गडकरींच्या म्हणण्यानुसार त्यांची निविदा 3600 कोटी रुपयांची होती. हे काम तुम्ही 2000 कोटींमध्ये कराल तर ठीक, नाहीतर आम्ही स्वतः करून घेऊ, असे म्हणत गडकरींनी अंबानींची निविदा नाकारली होती. धीरूभाईंचे टेंडर नाकारले गेले तेव्हा ते प्रचंड संतापले.

अंबांनींनी गडकरींना बोलावून विचारलं की एवढं मोठं बांधकाम स्वबळावर पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पुरेसं साधन आहे का? विनाकारण आग्रह करू नका, असा सल्लाही त्यांनी गडकरींना दिला होता.

गडकरी डगमगले नाहीत. त्यांनी धीरूभाईंना सांगितलं की ठीक आहे, मी छोटा माणूस आहे. मी प्रयत्न करेन पण दोन वर्षांत मी हा महामार्ग बांधून दाखवला, तर? पैज लावता का? त्यानंतर महामार्ग बांधणीचं काम सुरू झालं. ते केवळ दोन वर्षांत पूर्ण तर झालंच, पण फक्त १६०० कोटी रुपये खर्च झाले.

धीरूभाईंनी गडकरींना फोन केला आणि म्हणाले- "गडकरी तुम्ही जिंकलात आणि मी हरलो". धीरूभाईंनी कौतुक तर केलच पण ते इथंच थांबले नाहीत. काही काळानंतर बिल क्लिंटन भारतात आले होते. मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजमध्येही त्यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी गडकरी विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले होते, पण धीरूभाईंनी गडकरींची क्लिंटन यांच्यासोबत भेट घडवून दिली.

क्लिंटन यांच्यासमोर नितीन गडकरींचं धीरुभाई अंबानींनी कौतुक केलं. या मुलानं मुंबईतील अतिशय उत्तम पायाभूत सुविधा तयार केल्याचं क्लिंटन यांना धीरुभाईंनी सांगितलं

गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, जेव्हा ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी RSS कार्यकर्त्यानं त्यांना हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी रतन टाटा यांना आमंत्रित करण्याचा आग्रह केला. रतन टाटा हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते. मग त्यानं एक प्रश्न विचारला जो ऐकून मी हैराण झालो.

हे रुग्णालय फक्त हिंदूंसाठी आहे का? असं त्यावेळी मला रतन टाटांनी विचारलं आणि मला धक्काच बसला. त्यावर मी त्यांना तुम्हाला असं का वाटतं? असा प्रश्न केला होता. गडकरींच्या प्रश्नावर रतन टाटा म्हणाले, "कारण हे रुग्णालय आरएसएसचे आहे"

गडकरींनी मग ते पूर्णपणे फेटाळून लावलं आणि असं अजिबात नाही असं रतन टाटा यांना सांगितलं. हे रुग्णालय समाजातील सर्व समाजासाठी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असा धार्मक भेदभाव नाही, असं गडकरी म्हणाले.