नखांवर पांढरे डाग, वेडीवाकडी नखं कशामुळे होतात?; आजाराचे देतात संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:53 IST2025-02-22T16:50:26+5:302025-02-22T16:53:50+5:30

झिंक कमी असल्याचे तज्ज्ञांकडून लक्षात आणून दिल्यास काही विशिष्ट पदार्थ सेवन करून झिंकसह कॅल्शिअमची कमतरता दूर करता येऊ शकते.

अवयवांप्रमाणेच नखांवर असणारे पांढरे डाग किंवा रेषादेखील काही आजाराचे संकेत देतात. बऱ्याच लोकांच्या नखांवर पांढरे डाग किंवा रेषा असतात, ते कॅल्शिअमसह झिंक अथवा जस्ताच्या कमतरतेमुळेही होतात.

झिंकयुक्त पदार्थांचे सेवन करा- लोहानंतर झिंक हा दुसरा घटक आहे, जो शरीरात मुबलक प्रमाणात आढळतो. पेशींची वाढ, प्रथिने उत्पादन आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी झिंक आवश्यक असते.

शरीर झिंक तयार करत नाही किंवा अन्नपदार्थातून मिळणारे झिंक ते साठवू शकत नाही, त्यामुळेच झिंकयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते.

झिंकच्या कमतरतेची लक्षणे- पुरेशी झोप न येणे, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, वजन वाढणे, दात किडणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे, हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या, वास आणि चव कमी होणे, भूक न लागणे, जास्त केस गळणे, नखांवर पांढरे डाग ही प्रमुख लक्षणे आहेत.

झिंकसह कॅल्शिअमसाठी हे पदार्थ खावेत- शरीरात झिंकची कमतरता आहे की नाही, हे ओळखणे कठीण असते. कारण झिंक हे रक्तामार्फत छोट्या पेशींमध्ये विरघळलेले असते. त्यामुळे रक्ताची चाचणी केली तरी झिंकची कमतरता ओळखता येईलच असे नाही.

झिंक कमी असल्याचे तज्ज्ञांकडून लक्षात आणून दिल्यास काही विशिष्ट पदार्थ सेवन करून झिंकसह कॅल्शिअमची कमतरता दूर करता येऊ शकते. शेंगदाणे, मशरूम्स, तीळ, अंडे, दही, लसूण, राजमा, दलिया या पदार्थांचा आहार वाढवावा.