Vladimir Putin In India : जग पुतिन यांचं विमान शोधत राहिलं, आकाशात सुरू होता रहस्यमय खेळ, दिल्लीतील लँडिंगनंतर उलगडलं गूढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:51 IST2025-12-05T10:14:03+5:302025-12-05T10:51:03+5:30

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे "फ्लाइंग क्रेमलिन" काल जगातील सर्वात जास्त ट्रॅक केलेले विमान बनले. पुतिन काल भारत दौऱ्यावर आले आहेत.

कालचा दिवस ग्लोबल एव्हिएशन वॉचर्ससाठी एकदम थरारक ‘चेस सीक्वेन्स’सारखा होता. प्रत्येकजण आकाशात एकाच गोष्टीचा शोध घेत होते—रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे ‘फ्लाइंग क्रेमलिन’. दोन एकसारखे रशियन विमान भारताच्या दिशेने येत होते आणि दोन्ही अशा पद्धतीने लपंडाव खेळत होते की जगभरातील लोकांचं लक्ष त्यांच्यावर खिळलं.

कधी एका विमानाचा ट्रान्सपॉन्डर ऑन होई, त्यामुळे त्याचे अचूक लोकेशन दिसत होते, तर लगेच दुसऱ्याचा ऑफ होई. थोड्या वेळाने दोन्ही विमानांची स्थिती बदलत होती. तब्बल साडेसहा तास चाललेल्या या ‘लपंडाव’ खेळाने हजारो लोक हे विमान सतत ट्रॅक करत होते. संध्याकाळी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं ‘फ्लाइंग क्रेमलिन’ दिल्ली विमानतळावर उतरलं.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर फ्लाइट ट्रॅकिंग साइट Flightradar24 ने खुलासा केला की पुतिन यांचे हे विमान जगातील ‘सर्वाधिक ट्रॅक केले गेलेले विमान’ ठरले आहे.

पुतिन हे जगातील सर्वाधिक संरक्षित नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या परदेश दौर्‍यांमध्ये मल्टी-लेयर सिक्युरिटी प्रोटोकॉल लागू असतो. यातील प्रमुख भाग म्हणजे डिकॉय एअरक्राफ्ट स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजीचा उद्देश म्हणजे पुतिन कोणत्या विमानात आहेत हे जगाच्या नजरेपासून लपवणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या वास्तविक विमानाची ओळख शत्रूंपर्यंत पोहोचू न देणे.

गुरुवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे खास IL-96-300PU हे विमान—याला ‘फ्लाइंग क्रेमलिन’ म्हणतात—त्याच्या एकसारख्या ‘क्लोन’ विमानासह अशा पद्धतीने उडत होते की खरे विमान कोणते हे ओळखणे जवळजवळ अशक्य बनले होते.

साडेसहा तास ही रहस्यमय उड्डाणे आकाशात सुरू होती. या खेळात दोन्ही विमानांचे ट्रान्सपॉन्डर महत्त्वाची भूमिका बजावत होते.कधी एका विमानाचा ट्रान्सपॉन्डर बंद होई, कधी दुसऱ्याचा. कधी दोन्ही दिसत, कधी दोन्ही गायब होत होता.

ही विमाने सुरक्षित, एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सिस्टीम, अँटी-मिसाईल तंत्रज्ञान, जास्त रेंज, उच्च पातळीचे इलेक्ट्रॉनिक प्रोटेक्शन आणि सीक्रेट कमांड सेंटर अशा प्रणालींनी सुसज्ज आहेत. त्यामुळे जगभरातील लोकांमध्ये या विमानांविषयी अधिक कुतूहल निर्माण झाले होते.

संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे IL-96 ‘फ्लाइंग क्रेमलिन’ दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि अनेक तासांपासून चाललेला हा सस्पेन्स शेवटी संपला. रेड कार्पेटसमोर विमान उभे राहताच स्पष्ट झाले की पुतिन कोणत्या विमानातून आले आहेत.

पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यामध्ये ते मोदी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करुन . अनेक करार करणार आहेत.