UP Assembly Election Result 2022: M-Y फॅक्टरसह ही कारणे ठरली भाजपाच्या विजयात ठरली निर्णायक, यूपीत मिळवलं बंपर यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:17 PM2022-03-10T17:17:01+5:302022-03-10T17:25:44+5:30

Uttar Pradesh Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपानं बंपर यश मिळवलं आहे. २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या ५०-६० जागा घटल्या असल्या तरी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षावर मोठी आघाडी घेत भाजपाने बाजी मारली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाच्या विजयामागच्या अनेक कारणांचा आढावा घेतला जाऊ लागला आहेत. त्यातील प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपानं बंपर यश मिळवलं आहे. २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या ५०-६० जागा घटल्या असल्या तरी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षावर मोठी आघाडी घेत भाजपाने बाजी मारली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाच्या विजयामागच्या अनेक कारणांचा आढावा घेतला जाऊ लागला आहेत. त्यातील प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.

उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या विजयात एम वाय अर्थात मोदी योगी फॅक्टर निर्णायक ठरला. केंद्रात मोदी आणि राज्यात योगी हे डबड इंजिनचे सरकार विकासासाठी उपयुक्त ठरेल हा भाजपाचा प्रचार मतदारांना भावला आणि अनेक मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांबाबत नाराजी असूनही योगी आणि मोदींच्या नावावर भाजपाला मते मिळाली

गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात लक्षवेधी विकास झाला नसला तरी केंद्र सरकराकडून राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान सन्मान योजना अशा अनेक योजनांचा लाभ झालेला मोठा वर्ग होता. तसेच कोरोना काळाळ मोफत रेशन देण्याची योजनाही भाजपासाठी फायदेशीर ठरली.

उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना देशपातळीवर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यावरून योगी सरकारवर जोरदार टीकाही झाली होती. मात्र योगी सरकारने स्थानिक गुंड, बाहुबलींविरोधात घेतलेली कठोर भूमिका, अनेक गुंडांची तुरुंगात केलेली रवानगी याचा सकारात्मक परिणाम मतदानामध्ये झाला. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळाले.

यंदाच्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सामाजिक ध्रुविकरण झाले. अखिलेश यादव यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्यावर मुस्लिम आणि यादव त्यांच्यामागे एकगठ्ठा उभे राहताना दिसले. त्यामुळे त्याविरोधात भाजपाच्या बाजूने उलट ध्रुविकरण झाले. मुस्लिम-यादवांविरोधात यादवेत्तर ओबीसी, मागासवर्गीय एकजूट झाले. तर सुरुवातीच्या टप्प्यात वाढलेल्या मुस्लिम मतदानामुळे त्याविरोधात हिंदुत्ववादी मतदारांची एकजूट झाली.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्षाची ओळख ही मुस्लिम-यादवांचा पक्ष अशी आहे. हा समज बदलण्यासाठी अखिलेश यादव यांनी पुरेपुर प्रयत्न केले. विविध जातींच्या नेत्यांसोबत आघाडी केली. मात्र अखिलेश यादवांच्या बाजूने मुस्लिम-यादव एकजूट होत असल्याच्या बातम्यांनी सपाबाबत इतर मतदारांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यातच कायदा सुव्यवस्थेबातत सपाचा आधीचा इतिहास तितकासा चांगला नसल्याने तसेच यावेळीही अखिलेश यादवांनी अनेक बाहुबली नेत्यांना उमेदवारी दिल्याने त्याचे समाजवादी पक्षाला नुकसान झाले.

उत्तर प्रदेशात भाजपाच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असल्याचे दावे करण्यात येत होते. तसेच यावेळी गेल्या निवडणुकीप्रमाणे धार्मिक ध्रुविकरण न होता जातीपातींच्या समिकरणांनुसार मतविभागणी होईल, असा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात या जातीचे मतदार मोठ्या प्रमाणात भाजपासोबच राहिले.