नातेवाईक, लग्नसोहळे विसरले, घराचं वेळापत्रकच मुलासाठी बदललं! UPSC टॉपरच्या पालकांचा 'सक्सेस फॉर्म्युला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:34 IST2026-03-06T18:23:32+5:302026-03-06T18:34:11+5:30

UPSC Topper Anuj Agnihotri: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. राजस्थानमधील रावतभाटा येथील रहिवासी डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, राजस्थानमधील रावतभाटा येथील अनुज अग्निहोत्री याने देशात प्रथम क्रमांक पटकावून नवा इतिहास रचला आहे.

एका सामान्य तंत्रज्ञाचा मुलगा ते देशातील सर्वात कठीण परीक्षेचा टॉपर, असा अनुजचा हा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. २६ वर्षीय अनुज हा जोधपूर एम्सचा माजी विद्यार्थी आहे. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्याने डॉक्टर म्हणून करिअर करण्याऐवजी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. हे त्याचे तिसरे प्रयत्न होते.

विशेष म्हणजे, २०२३ मध्ये त्याची निवड दानिक्स सेवेसाठी झाली होती, मात्र त्याचे लक्ष आयएएस होण्यावरच होते. अखेर जिद्दीच्या जोरावर त्याने अव्वल स्थान गाठलेच.

अनुजचे वडील कृष्ण बिहारी अग्निहोत्री हे राजस्थानमधील अणुऊर्जा केंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे कुटुंब १९६४ मध्येच राजस्थानमध्ये स्थायिक झाले होते.

अनुजच्या यशाचे श्रेय देताना त्याचे वडील म्हणतात, "आम्ही मुलांच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केले होते. मोठ्या मुलाने एमबीबीए केले आणि तो हैदराबादमध्ये स्थायिक आहे. अनुजने एमबीबीएसनंतर तयारी सुरू केली आणि आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला."

अनुजच्या यशात त्याच्या आईचा, मंजू अग्निहोत्री यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून या माऊलीने अनेक वर्षे स्वतःच्या आनंदाचा त्याग केला.

मुलांच्या अभ्यासात थोडाही व्यत्यय येऊ नये किंवा त्यांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून या दाम्पत्याने वर्षानुवर्षे कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यांना, लग्नांना किंवा कार्यक्रमांना हजेरी लावली नाही. नातेवाईकांपासून दूर राहून त्यांनी घरामध्ये अभ्यासाचे एक वातावरण तयार केले होते.

अनुजच्या अभ्यासाचे वेळापत्रक केवळ त्याच्यापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण घराची दिनचर्या त्याच्याभोवती फिरत असे. आईने अनुजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीची झोप यासाठी अत्यंत कडक वेळापत्रक आखले होते. जेणेकरून त्याला वेळेवर पौष्टिक आहार मिळेल आणि अभ्यासाचा ताण येणार नाही. मुलाच्या एकाग्रतेसाठी पालकांनी स्वतःच्या मनोरंजनावर आणि आरामावर मर्यादा आणल्या होत्या.

मुलाच्या यशाने भारावून गेलेल्या मंजूताई आता श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी वृंदावनला जाण्यास उत्सुक आहेत. "आम्ही प्रेमानंद महाराजांचे अनुयायी आहोत. आता मुले स्थिरस्थावर झाली आहेत, त्यामुळे मला शांतीसाठी आणि मुलांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रार्थना करायला कृष्णनगरीला जायचे आहे," असे त्यांनी आनंदाने सांगितले.