रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:57 IST2022-02-17T15:50:11+5:302022-02-17T15:57:15+5:30
युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर काही प्रमाणात तणाव निवळला होता. मात्र, रशियाने सैन्य माघारीची घोषणा करूनही त्या ठिकाणी आणखी ७००० सैन्य तैनात केली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाची घोषणा खोटी असून युक्रेनवर हल्ला करण्यासाठी या सैन्याचा वापर होऊ शकतो असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी 'एसोसिएटेड प्रेस'ला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी 'एबीसी न्यूज'ला सांगितले की, आम्ही रशियन सैन्य माघारी जाताना पाहिले नाही. पुतीन कधीही हल्ला करू शकतात. युक्रेनवर हल्ला करायचा असल्यास त्यासाठी ही सुसज्जता असल्याचे त्यांनी म्हटले.

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की युतीने "रशियन सैन्याने माघार घेतल्याचे आम्ही पाहिले नाही. ब्रुसेल्समध्ये नाटो गटांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या आधी त्यांनी हे वक्तव्य केले. रशियाने खरंच सैन्य माघारी घेतले असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू असेही त्यांनी म्हटले.

रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेल्या सुमारे दीड लाख सैन्यापैकी काही लष्करी तुकड्या माघारी बोलाविल्या आहेत. सीमेवरील आमचा युद्धसराव संपल्याचे रशियाने जाहीर केले. मात्र, या घोषणेनंतर लगेचच युक्रेनचे लष्कर व अन्य सरकारी खात्यांच्या वेबसाइटवर सायबर हल्ले झाले आहेत. या कृत्यामागे रशियाचाच हात असल्याचा आरोप युक्रेनच्या नागरिकांनी केला.

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने युरोप, अमेरिकेसह सारे जग चिंताक्रांत झाले आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ सोल्झ यांनी युक्रेनला जाऊन तेथील राज्यकर्त्यांशी चर्चा केली. ते रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याही संपर्कात आहेत. युक्रेनवर आक्रमण करण्यापासून रशियाला परावृत्त करण्याचा सोल्झ यांचा प्रयत्न आहे.

युद्धाचे सावट असलेल्या युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार विमानांची उड्डाणे वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे अधिकारी विविध विमान कंपन्यांशी सध्या चर्चा करत आहेत.

तसेच गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या हालचाली वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र खात्याचे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरातच रशियाने युक्रेनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रशियाचा दोस्तराष्ट्र असलेल्या बेलारूसच्या साह्याने १ लाख १० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आले होते. आता ही संख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली असल्याचा नार्वेजियन गुप्तचरांचा होरा आहे. त्याचबरोबर डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या बफर प्रदेशातही ३२ हजार सैनिक पेरण्यात आले आहेत.

















