.... म्हणून पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर चालवला बुलडोझर, समोर येताहेत तीन कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:47 IST2025-03-20T11:26:35+5:302025-03-20T11:47:39+5:30
Action On Farmer Protest in Punjab: शेतकरी आंदोलनावर कारवाई करण्यामागे पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने विचापूर्वक आखलेली रणनीती असल्याचं बोललं जात आहे. तसेच या कारवाईमागची काही प्रमुख कारणंही समोर येत आहेत.

मागच्या वर्षभरापासून शंभू आणि खनौरी बॉर्डवर तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन उधळून लावण्यात आलं आहे. पंबाज पोलिसांनी रात्री अचानक कारवाई करत आंदोलन स्थळावर उभारण्यात आलेल्या तंबूंसह इतर साहित्यावर बुलडोझर चालवला. तसेच जवळपास १३ महिन्यांनंतर शंभू बॉर्डर खुली करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनावर कारवाई करण्यामागे पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने विचापूर्वक आखलेली रणनीती असल्याचं बोललं जात आहे. तसेच या कारवाईमागची काही प्रमुख कारणंही समोर येत आहेत.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेला पंजाबचा दौरा, लुधियानामध्ये उद्योगपतींकडून आम आदमी पक्षाला देण्यात आलेला फिडबॅक आणि लुधियानात होऊ घातलेली पोटनिवडणूक यामुळे भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनावर कारवाई केल्याचा दावा केला जात आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मागच्या आठवड्यात पंजाबचा दौरा केला होता. त्यावेळी ते लुधियानामध्येही गेले होते. त्यावेळी शंभू आणि खनौरी बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू राहिलं तर आगामी पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला मतं मिळणार नाहीत, असे लुधियानामधील उद्योगपतींनी केजरीवाल यांना सांगितले होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचं उद्योगपतींनी यावेळी सांगितलं. पंजाबच्या दोन्ही सीमांवर वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत असल्याने व्यापार आणि ट्रकची वाहतूक विस्कळीत होत असल्याची तक्रारही या व्यापाऱ्यांनी केजरीवाल यांच्याकडे केली होती.
अशा परिस्थितीत पंजाबमधील आम आदमी सरकारने विचारपूर्वक रणनीती आखून शेतकरी आंदोलकांवर कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी दोन्ही सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन आंदोलक शेतकऱ्यांना घटनास्थळावरून हटवण्याचा सरकारचा विचार नव्हता.
मात्र हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पंजाब सरकारकडून योग्य वेळेची वाट पाहिली जात होती. अखेर बुधवारी सरकारला तशी संधी मिळाली. काल शेतकरी नेते सर्वण सिंग पंढेर आणि जगजीत सिंग डल्लेवाल केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठकीसाठी चंडीगड येथे आले होते. या नेत्यांची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली होती. पण यादरम्यान, शेतकरी नेत्यांच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर होती. तसेच हे शेतकरी नेते शंभू बॉर्डरकडे रवाना होताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि ते शंभू बॉर्डरवर पोहोचताच त्यांना ताब्यात घेतले.
त्याचबरोबर पंजाब पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह खनौरी बॉर्डरवर धडक देत तेथील आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच तिथे उभारण्यात आलेल्या तंबूंसह इतर साहित्य उखडून टाकले.
आता पंजाबमधील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपाने या कारावाईचा निषेध केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप केला आहे.