मुख्यमंत्री KCR सत्तेची हॅट्रीक करणार की भाजप-काँग्रेस संधी साधणार; तेलंगणाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 06:46 PM2023-10-13T18:46:40+5:302023-10-13T18:50:24+5:30

भाजप-काँग्रेस 'किंग' तर MIM 'किंगमेकर' बनण्याच्या तयारीत; केसीआर यांच्यासमोर मोठे आव्हान

Telangana Election 2023: तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील सर्व 119 विधानसभा जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या निवडणूक प्रचाराचा जोर वाढवला आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख केसीआर (kcr) सत्तेची हॅटट्रिक साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, पण 2014 आणि 2019 प्रमाणे यावेळीही त्यांना मोठी मेहनत करावी लागणार आहे. 'किंग' बनण्यासाठी काँग्रेस आणि भाजप पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर बसपा आणि AIMIM 'किंगमेकर' बनण्यासाठी उत्सुक आहे.

केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक करणार?- 2013 मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून केसीआर यांचे वर्चस्व राहिले आहे. 2014 आणि 2019 मध्ये प्रचंड बहुमताने सलग दोन निवडणुका जिंकून केसीआर सत्तेवर आहेत. आता तिसऱ्यांदा विजय नोंदवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरू आहे. आत्तापर्यंत केसीआर यांना तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागांतून प्रचंड मतदान मिळाले, परंतु यावेळी त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे.

केसीआर यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या दीड महिन्यापूर्वीच 119 पैकी 105 जागांसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ओवेसींच्या पक्षाशी उत्तम समन्वय राखून मुस्लिम मते मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असतानाही तेलंगणात यावेळी काँग्रेस आणि भाजप ज्या प्रकारे आव्हान म्हणून उभे आहेत, त्यामुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

यावेळी केसीआरसमोर सर्वात मोठे आव्हान काँग्रेसचे आहे. कर्नाटक विधानसभा विजयानंतर काँग्रेसने तेलंगणा काबीज करण्याची तयारी केली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेणावथा रेड्डी यांच्या जाहीर प्रचारात मिळालेल्या यशामुळे पक्ष उत्साही असून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे. प्रियंका गांधी वढेरा, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या सभेत सोनिया गांधींना ऐकण्यासाठी जमलेल्या गर्दीने बीआरएसला घाम फोडला आहे. याशिवाय, अलीकडेच बीआरएसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून तेलंगणात भाजप सक्रिय आहे. प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी आक्रमकपणे निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी निजामाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा, ज्यामध्ये त्यांनी केसीआरवर एनडीएमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. भाजप उघडपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली होती, यावेळी भाजप आमदारांची संख्या दुहेरी आकड्यावर नेण्याचा प्रयत्न करत आहे.

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन तेलंगणातील अनेक भागात मजबुत आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर प्रत्येकी सात जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. ओवेसींच्या पक्षाने हैदराबादच्या जुन्या शहरातील विधानसभा जागांवर विजय मिळवला. अशा स्थितीत किंगमेकर बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांना मुस्लिम मते आपल्याजवळ ठेवायची आहेत. तेलंगणात एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांना वाटते. बसपाही ओवेसींच्या पावलावर पाऊल टाकत, दलित समाजाच्या मदतीने किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे.