Bihar Political Crisis: 9वी फेल क्रिकेटर ते बिहारच्या राजकारणातला टॉपर! खुद्द मोदींनीही वजन जोखले, विरोधक चाट पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 02:28 PM2022-08-11T14:28:51+5:302022-08-11T14:32:14+5:30

Bihar Political Crisis: क्रिकेटसाठी शिक्षण सोडणारे तेजस्वी यादव आता राजकारणात मोठी इनिंग खेळण्यास तयार झाले आहेत.

पाटणा: बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. जदयू प्रमुख नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत आघाडी सरकार स्थापन केले. यासोबतच ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कायम राहिले तर लालूंचे सुपूत्र तेजस्वी प्रसाद यादव (32) यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

एकेकाळी क्रिकेटमध्ये चौकार-षटकार ठोकणारे तेजस्वी राजकारणात विरोधकांना मैदानाबाहेर उडवतील, याचा कुणी विचारही केला नव्हता. एका विश्लेषकाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, तेजवस्वी यांनी आपली ताकद इतरत्र(क्रिकेटच्या मैदानावर) दाखवली आणि त्याचा परिणाम राजकीय क्षेत्रात दिसून आला. आता तेजस्वी दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादव यांना नववी नापास म्हटले जाते. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही. मात्र शिक्षणात मागे राहिलेल्या तेजस्वी यांनी राजकारणात पहिला क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यांना नेहमीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले होते. नितीश कुमार यांनी 2017 मध्ये तेजस्वीची साथ सोडल्यानंतर, तेजस्वी यांनी कमालीची परिपक्वता दाखवली आणि सत्ताधाऱ्यांना टफ फाईट दिली. राज्यात अलीकडे ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, त्याला 'ऑपरेशन तेजस्वी' म्हटले जात आहे. तेजस्वी यांनी हा सगळा राजकीय डाव कसा मांडला, याचा भाजपला पत्ताही लागू दिला नाही.

तेवस्वी यांच्या या सर्व राजकीय डावपेचामुळे त्यांनी लालूंचा योग्य राजकीय वारसदार असल्याचे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, पूर्व क्रिकेटर असलेल्या तेजस्वी चार सीझन (2008-12) दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये होते. 2012 मध्ये ते राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना क्रिकेटच्या मैदानातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी क्रिकेटच्या मैदानातून बिहारच्या राजकारणात प्रवेश केला. सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, दारूबंदी, नोकऱ्या, विकास हे या मुद्द्यांवर त्यांनी हात घातला. 'मला दारू नाही पुस्तक हवय, मद्यालय नाही विद्यालय हवंय' अशा घोषणा त्यांनीच तयार केल्या.

बुधवारी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर तेजस्वी यांनी राज्यातील जनतेसाठी मोठ्या घोषणा केल्या. यात, येत्या महिनाभरात राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत रात्रंदिवस काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा लढा बेरोजगारीविरुद्ध आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांना गरीब आणि तरुणांच्या वेदना जाणवल्या. महिन्याभरात गरीब आणि तरुणांना बंपर नोकऱ्या देऊ, असे आश्वासह तेजस्वी यांनी दिले.

2015 मध्ये तेजस्वी एक परिवक्तव नेते बनले आणि राघोपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकली. वयाच्या 26व्या वर्षी ते महागठबंधन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. पण, नितीश कुमारांनी राजदशी संबंध तोडल्यामुळे महागठबंधन सरकार जास्त काळ चालले नाही. यानंतर नितीश यांनी 2017 मध्ये भाजपशी हातमिळवणी केली होती.

आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी म्हणतात की, 'मी तेजस्वी यांना विकसित होताना पाहिले आहे. 2020 च्या निवडणुकीत भाजपने जातीयवादी मुद्दे उपस्थित केले होते तर तेजस्वी यांनी रोजगार हा मुद्दा बनवला. यावरून ते राजकीयदृष्ट्या हुशार असल्याचे दिसून येते.