जिल्हा परिषदेत शिक्षण ते IAS ऑफिसर म्हणून सिलेक्शन; अनेकांसाठी प्रेरणादायी ठरताहेत सुरभी गौतम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:04 PM2020-04-27T12:04:19+5:302020-04-27T12:12:15+5:30

जिल्हा परिषदेत शिक्षण, इंग्रजीवर फारसं प्रभुत्व नसल्यानं सहन करावी लागणारी हेटाळणी यामुळे डगमगून न जाता पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालेल्या सुरभी गौतम यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातल्या अमदरा गावात शिकलेल्या सुरभी यांनी दहावी, बारावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.

आपल्याला पुढे आयएएस व्हायचंय अशी खूणगाठ सुरभी यांनी दहावी उत्तीर्ण होताच मनाशी बांधली.

सुरभी यांचे वडील मैहर सत्र न्यायालयात वकील असून त्यांची आई सुशीला शिक्षिका आहे. त्यांनी सुरभीला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवलं. शिक्षणासाठी शहरात गेलेली सुरभी गावातली पहिली मुलगी होती.

शहरात आलेल्या सुरभी यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. इंग्रजीत संवाद साधण्याची सवय नसल्यानं त्यांना मोठ्या अडचणी आल्या.

इंग्रजी बोलता येत नसल्यानं वर्गात सुरभी यांची टिंगल केली जायची. सर्व विषयांत पहिल्या येणाऱ्या सुरभी यांना इंग्रजी विषय अतिशय कठीण जायचा.

सुरभी यांनी इंजिनीयरिंगची प्रवेश परीक्षा दिली. त्यात त्यांना अतिशय चांगले गुण मिळाले. त्यामुळे सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरभी यांनी भोपाळमधल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समधून इंजिनीयरिंग केलं.

विद्यापीठात अव्वल स्थान मिळवलेल्या आणि सुवर्ण पदक विजेत्या सुरभी यांनी २०१६ मध्ये आयएएस परिक्षेत ५० वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आयएसएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

विशेष म्हणजे आएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी भाभा अणू संशोधन केंद्रात वर्षभर काम केलं.

सुरभी यांनी दिलेल्या आणि यश मिळवलेल्या परिक्षांची यादी बरीच मोठी आहे. गेट, इस्रो, सेलमध्ये त्यांची निवड झाली होती. इस्रोनं घेतलेल्या परिक्षेत तर त्या देशात दुसऱ्या आल्या होत्या.

सुरभी यांनी एमपीपीएससी प्री, एसएससी एलजीएल, दिल्ली पोलीस आणि एफसीआय परिक्षांमध्येही नेत्रदीपक यश मिळवलं. २०१३ मध्ये झालेल्या आयईएस परिक्षेत त्या देशात पहिल्या आल्या होत्या.

आयईएस परिक्षेत देशात प्रथ क्रमांक पटकावल्यानंतर त्यांनी आयएएस परिक्षेची तयारी सुरू केली. या परिक्षेत पहिल्याच फटक्यात त्यांनी मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय.